कल्याण (ठाणे) : मनसे नेते अमित ठाकरे कल्याण-डोंबिवलीच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान अमित ठाकरे यांनी रस्त्यांवर असलेल्या खड्ड्यांवरुन शिवसेनेला लक्ष केलं. शिवेसेनेची 25 वर्षे सत्ता असतानाही कामं होऊ शकत नाहीत. जोपर्यंत हे सत्तेत आहेत, तोपर्यंत रस्ते नाहीच सुधारणार, अशी टीका अमित ठाकरेंनी केली होती. त्यांच्या या टीकेला शिवसेनेचे नेते वरुण सरदेसाई यांनी प्रत्युत्तर दिलं.
“त्यांच्या पक्षाचे नेते आहेत. त्यांच्या पक्षाचं काम करण्याचा त्यांना अधिकार आहे. गेली पंचवीस वर्ष कल्याण-डोंबिवलीमधील नागरिकांनी शिवसेनेवर विश्वास दाखवला. हा विश्वास खरा करण्यासाठी शिवसेना नेते-पदाधिकारी दिवस-रात्र काम करत आहेत. स्थानिक पातळीवर कोण काम करतं ते नागरिकांना माहिती आहे. येत्या निवडणुकीत नागरीक पुन्हा शिवसेनेच्या पाठीशी उभे राहतील”, अशा शब्दात वरुण सरदेसाई यांनी अमित ठाकरे यांच्या वक्तव्याला उत्तर दिलंय
पक्षातील पदाधिकाऱ्यांचा मुलाखतीसाठी युवासेना सचिव वरुण सरदेसाई हे शनिवारी (2 ऑक्टोबर) कल्याणमध्ये आले होते. कल्याणच्या कोळशेवाडीतील शिवसेना शाखेत सरदेसाई यांनी पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. त्यानंतर कल्याण पश्चिम येथील टिळक चौक शिवसेना शाखेत त्यांची पुढची बैठक झाली. यादरम्यान युवासेना नेते दीपेश म्हात्रे, हर्षवर्धन पालांडे, माजी नगरसेवक निलेश शिंदे, माजी नगरसेवक महेश गायकवाड उपस्थित होते.
या दौऱ्यादरम्यान प्रसारमाध्यमांसोबत बोलताना त्यांना शिवसेना नेते रामदास कदम यांच्या कथित ऑडिओ क्लिपविषयी प्रश्न विचारण्यात आलं. यावेळी त्यांनी आपण ती ऑडिओ क्लिप ऐकली नाही. त्यामुळे त्या विषयावर फारसं भाष्य करु शकत नाही, असं म्हणत आपली भूमिका स्पष्ट केली.
शिवसेनेचे नेते रामदास कदम आणि प्रसाद कर्वे नावाच्या व्यक्तिच्या तीन कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत. या तिन्ही क्लिपमधून रामदास कदम यांनीच भाजप नेते किरीट सोमय्या यांना परिवहन मंत्री अनिल परब विरोधातील दारुगोळा पुरावल्याचं दिसून येत आहे. मात्र, रामदास कदम यांनी या ऑडिओ क्लिप फेक असल्याचं सांगत या संभाषणाशी आपला काहीच संबंध नसल्याचं म्हटलं आहे. तसेच हा आपल्या बदनामीचा कट असल्याचंही म्हटलं आहे. मात्र, या तीन ऑडिओ क्लिपमुळे एकच खळबळ उडाली असून शिवसेना काय भूमिका घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
शिवसेनेत भूकंप येईल अशी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधात सर्व मटेरीयल हे शिवसेनेचेच नेते रामदास कदम यांनीच पुरवल्याचा आरोप मनसेचे स्थानिक नेते वैभव खेडेकर यांनी केला होता. त्यावर शिक्कामोर्तब होईल अशा पद्धतीची ऑडिओ क्लिप व्हायरल झालीय. टीव्ही 9 मराठी या क्लिपची पुष्टी करत नाही. पण ज्या दोन ते तीन ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यात त्यात, परबांच्याविरोधात जी ईडीनं कारवाई केली त्यावर कदम वाह वाह म्हणताना दिसत आहेत. एवढंच नाही तर प्रसाद कर्वे हा रामदास कदमांचा कार्यकर्ता एकाच वेळेस कदम आणि सोमय्यांच्या संपर्कात होता असंही दिसतंय.
संबंधित बातम्या:
ते पाप माझ्या हातून होणार नाही, व्हायरल ऑडिओ क्लिपनंतर रामदास कदम यांची पहिली प्रतिक्रिया
शिवसेनेत भूकंप? परबांच्याविरोधात ईडीची कारवाई, रामदास कदम म्हणतात, वाहवा वाहवा, ऑडिओ क्लिप व्हायरल