कल्याण (ठाणे) : युवासेना नेते वरुण सरदेसाई यांच्याकडून पदाधिकाऱ्यांची मुलाखती घेतल्यानंतर कल्याण पूर्वेतील युवासेना पदाधिकाऱ्याला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे ही मारहाण शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनीच केली असल्याचे आरोप करण्यात आले आहे. त्यामुळे पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचे चिन्हं आहेत. या प्रकरणाची चौकशी करुन या संदर्भात कारवाई करणार असल्याचे वरुण सरदेसाई यांनी सांगितले आहे.
युवा युवासेना सचिव वरुण सरदेसाई गेल्या दोन दिवसांपासून कल्याणमध्ये दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत. या दरम्यान सरदेसाई यांनी युवासेनेत पदांसाठी इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांची मुलखती घेतल्या. शनिवारी कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरात शिवसेना शाखेत सरदेसाई यांनी युवासेना नेता दीपेश म्हात्रे यांच्यासोबत अनेक कार्यकर्त्यांचा मुलाखती घेतल्या.
कल्याण पूर्वेचे युवासेना पदाधिकारी संजय मोरे हे वरुण सरदेसाई आणि दीपेश मात्रे यांना भेटण्यासाठी आले होते. या भेटीनंतर संजय मोरे हे आपल्या घरी जात असताना शिवसेना शाखेच्या पाठीमागे ते पायी जात असताना त्यांना मारहाण करण्यात आली. शिवसेनेचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना विनाकारण मारहाण केल्याचा आरोप संजय मोरे यांनी केला आहे.
या मारहाणीत त्यांच्या कानाला आणि पोटात दुखापत झाली आहे. मोरे यांनी या प्रकरणी कल्याणच्या कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी त्यांना तक्रार अर्ज दाखल करा, असा सल्ला दिला होता. त्यानंतर त्यांनी तक्रार अर्ज दाखल करत न्यायाची मागणी केली आहे. विशेष म्हणजे त्यांनी पक्षश्रेष्ठींकडेही न्यायाची मागणी केली आहे.
या प्रकरणानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी महेश गायकवाड यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी कॅमेऱ्यावर काही बोलण्यास नकार दिला. दुसरीकडे युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांचे म्हणणे आहे की, या प्रकरणाची माहिती घेऊन कारवाई करण्यात येईल. ती कारवाई होईल तेव्हा होईल. पण या प्रकरणामुळे कल्याण पूर्वेत शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.
दरम्यान, वरुण सरदेसाई यांच्या दौऱ्याआधी मनसे नेते अमित ठाकरे यांनी कल्याण-डोंबिवली शहराचा दौरा केला होता. या दौऱ्यादरम्यान त्यांनी रस्त्यांवर असणाऱ्या खड्ड्यांवरुन शिवेसेनेवर टीका केली होती. त्यांच्या या टीकेला वरुण सरदेसाई यांनी प्रत्युत्तर दिलं होतं. “त्यांच्या पक्षाचे नेते आहेत. त्यांच्या पक्षाचं काम करण्याचा त्यांना अधिकार आहे. गेली पंचवीस वर्ष कल्याण-डोंबिवलीमधील नागरिकांनी शिवसेनेवर विश्वास दाखवला. हा विश्वास खरा करण्यासाठी शिवसेना नेते-पदाधिकारी दिवस-रात्र काम करत आहेत. स्थानिक पातळीवर कोण काम करतं ते नागरिकांना माहिती आहे. येत्या निवडणुकीत नागरीक पुन्हा शिवसेनेच्या पाठीशी उभे राहतील”, अशा शब्दात वरुण सरदेसाई यांनी अमित ठाकरे यांच्या वक्तव्याला उत्तर दिलं होतं.
हेही वाचा : स्थानिक पातळीवर कोण काम करतंय ते नागरिकांना माहिती, अमित ठाकरेंच्या टीकेला वरुण सरदेसाई यांचं उत्तर