Milind More Death Case Update : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ठाण्याचे उपशहर प्रमुख मिलिंद मोरे यांचे अकस्मात निधन झाले. विरारच्या सेव्हन सी बीच रिसॉर्ट या ठिकाणी उभे असताना ते अचानक कोसळले. मिलिंद मोरे यांच्या मृत्यूपूर्वी त्यांना जमावाकडून मारहाण करण्यात आल्याची घटना घडली होती. यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप केला जात आहे. आता मिलिंद मोरेंच्या मारहाणीप्रकरणी 11 आरोपींना 4 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
मिलिंद मोरे हे त्यांच्या कुटुंबासोबत विरारच्या अर्नाळा, नवापूर या ठिकाणी असलेल्या सेव्हन सी बीच रिसॉर्ट या ठिकाणी गेले होते. त्यावेळी एका रिक्षाचालकाने त्यांच्या पुतण्याला धक्का दिला. यावरुन बाचाबाची झाली. यानंतर रिक्षाचालकाने गावात जाऊन ही बाब गावकऱ्यांना सांगितली. यानंतर रिक्षाचालक आपल्या साथीदारांना घेऊन रिसॉर्ट जवळ आला. त्याने मिलिंद मोरे आणि त्यांच्या पुतण्यावर हल्ला केला.
यावेळी हल्लेखोरांनी दोघांनाही बेदम मारहाण केली. या मारहाणीत वर्मी घाव बसल्याने मोरे यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते जागीच कोसळले. यानंतर त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण तिथे त्यांना मृत घोषित केले गेले. मिलिंद मोरे कोसळल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेनंतर हल्लेखोर पसार झाले.
या प्रकरणानंतर अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. विरारच्या सेव्हन सी बीच रिसॉर्टच्या मालकासह अन्य दहा जणांना पोलिसांनी अटक केली होती. या सर्व आरोपींना वसई न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी 11 आरोपींना 4 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
तसेच मिलिंद मोरेंच्या मृत्यूनंतर विरारच्या अनधिकृत असलेल्या सेवन सी रिसॉर्टवरही कारवाई करण्यात आली. पालिका प्रशासनाने सेवन सी रिसॉर्टवर तोडक कारवाई केली आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच १५ ते १६ तासांहून जास्त वेळ ही तोडक कारवाई सुरु होती. या कारवाईनंतर हे रिसॉर्ट पूर्णपणे भुईसपाट करण्यात आले आहे.