कल्याण (ठाणे) : दररोज हजारो प्रवासी कल्याण रेल्वे स्टेशन ते भिवंडी आणि भिवंडी ते कल्याण स्टेशन असा प्रवास करतात. कल्याण रेल्वे स्टेशनला भिवंडीला जाणाऱ्या अनेक रिक्षा असतात. पण बरेच नागरिक बसने प्रवास करतात. कल्याण-भिवंडी बसने प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्तच आहे. हे सगळं सांगण्यामागील मुख्य कारण म्हणजे भिवंडीहून निघालेल्या एका बसमध्ये साप आढळल्याने वाहन चालकासह वाहक आणि प्रवाशांची आज चांगलीच भंबेरी उडाली.
शहापूर बस डेपोतील राज्य परिवहन महामंडळाची एक बस घेऊन चालक राहूल कलाने हे भिवंडीहून कल्याणला निघाले. बसमध्ये प्रवासी देखील मोठ्या प्रमाणात होते. अर्ध्या रस्त्यात आल्यावर बसमध्ये चालक आणि प्रवाशांना एक साप दिसून आला. सापाला पाहताच चालक आणि वाहकासह प्रवाशांची भंबेरी उडाली.
यावेळी चालकाने त्वरीत कल्याण एसटी डेपोला याबाबत माहिती दिली. एसटी डेपोतील अधिकाऱ्यांनी सर्पमित्र दत्ता बोंबे यांना सांगितले. बोंबे यांनी चालकाला घाबरु नका. बस डेपोत घेऊन या, असा सल्ला दिला. ही बस कल्याण बस डेपोत पोहचली. कल्याण डेपोच्या कार्यशाळेतील मॅकेनिक बसमध्ये चढले. त्यांनी पत्रा कापला असता त्याखाली साप दिसला. हा तस्कर जातीचा साप आहे. हा विषारी साप नाही. या तस्कर सापाचा भिवंडी कल्याण प्रवासामुळे बसमध्ये एकच खबबळ उडाली होती. त्याला जंगलात सोडण्यात आले.
दोन दिवसांपूर्वी ठाण्यात देखील अशीच काहिशी घटना समोर आली होती. ठाणे घोडबंदर रोडवर पातलीपाडा परिसरात वीज खंडीत झाली होती. त्यामुळे महावितरणाचे कर्मचारी ट्रान्सफॉर्मरच्या दुरुस्तीसाठी आले होते. यावेळी काम करत असताना जाळीमध्ये हिरवा चापडा हा विषारी साप आढळला. यावेळी महावितरणाच्या कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. यावेळी सर्पमित्र अभिलाष डावरे आणि सचिन सूर्यवंशी यांना संपर्क करुन बोलावण्यात आलं. सर्पमित्रांनी हिरवा चापडा सापाला सुरक्षितपणे पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले होते.
VIDEO : सापाचा बसमध्ये भिवंडी ते कल्याण प्रवास, सर्पमित्र दत्ता बोंबे यांनी साप पकडून जंगलात सोडला #Snake #Thane #Kalyan pic.twitter.com/GsXXxuZnvK
— CHETAN PATIL (@chetanpatil1313) July 27, 2021
हेही वाचा : ट्रान्सफॉर्मर दुरुस्त करत असताना अचानक जाळीत विषारी साप दिसला, महावितरण कर्मचाऱ्यांची तारांबळ