निनाद करमरकर, प्रतिनिधी, अंबरनाथ (ठाणे) : ठाकरे गटाचे कल्याण लोकसभा संपर्कप्रमुख सुभाष भोईर यांनी कल्याण लोकसभेची जागा लढवण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केल्याचं पाहायला मिळतंय. एकीकडे महाविकास आघाडीत ठाणे आणि कल्याणची जागा ठाकरे गटाला सोडण्याच्या हालचाली सुरू आहेत. दुसरीकडे कल्याण लोकसभेतील अंबरनाथ शहरात सुभाष भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेल्या बॅनर्सवर भोईर यांचा भावी खासदार असा उल्लेख करण्यात आला आहे.
सुभाष भोईर हे २०१४ साली कल्याण ग्रामीण विधानसभेतून शिवसेनेच्या तिकिटावर आमदार झाले होते. मात्र २०१९ सालच्या निवडणुकीत त्यांचं तिकीट कापत केडीएमसीचे नगरसेवक रमेश सुकऱ्या म्हात्रे यांना संधी देण्यात आली होती. त्या निवडणुकीत रमेश म्हात्रे यांचा पराभव होऊन मनसेचे राजू पाटील हे आमदार म्हणून निवडून आले होते.
आपलं तिकीट कापलं गेल्याने सुभाष भोईर हे एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर नाराज असल्याची चर्चा होती. त्यामुळेच एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर सुभाष भोईर यांनी मात्र ठाकरे गटातच राहणं पसंत केलं होतं. इतकंच नव्हे, तर कल्याण लोकसभेचं संपर्कप्रमुखपद देखील त्यांना देण्यात आलं होतं.
यानंतर आता सुभाष भोईर यांनी आपलं तिकीट कापल्याचा वचपा काढण्यासाठी थेट श्रीकांत शिंदे यांनाच शह देण्याचा प्रयत्न सुरू केल्याची चर्चा आहे. कारण सुभाष भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त अंबरनाथ शहरात लावलेल्या बॅनर्सवर त्यांचा ‘भावी खासदार’ असा उल्लेख करण्यात आला आहे.
महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ठाणे आणि कल्याण या लोकसभेच्या दोन जागा ठाकरे गटाला सोडल्या जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे तसं झालं, तर आपल्यालाच लोकसभेचं तिकीट मिळावं आणि आपल्यावर झालेल्या अन्यायाचा वचपा काढता यावा. असा सुभाष भोईर यांचा प्रयत्न आहे का? असा प्रश्न यानंतर उपस्थित झालाय.