कल्याण: ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी कल्याणमध्ये जाऊन थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे खासदार पुत्र श्रीकांत शिंदे यांनाच ललकारले. कल्याणमध्ये भाजप नेते अनुराग ठाकूर यांनी लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे. हाच धागा पकडून सुषमा अंधारे यांनी श्रीकांत शिंदे यांना सावध राहण्याचा इशारा दिला. अनुराग ठाकूर यांची कल्याणमधील एन्ट्री श्रीकांत शिंदे यांच्यासाठी धोक्याची घंटा आहे. वॉरंट बेल आहे बेटा. श्रीकांत संभल जा. अभी भी टाईम है, असा सल्लाच सुषमा अंधारे यांनी दिला.
सुषमा अंधारे यांची काल कल्याणमध्ये प्रबोधन यात्रा पार पडली. यावेळी त्यांनी श्रीकांत शिंदे यांना हा सल्ला दिला. सत्तेच्या स्वार्थासाठी तुम्ही तिकडे गेला. पण तुमच्या हातात सत्ता राहणार नाही. कारण भाजपने तुम्हाला फक्त सत्तेचं गाजर दाखवलं आहे. त्यामुळे आता श्रीकांत शिंदे यांच्या खबऱ्यांनी कामे चोख पार पाडावीत, असा चिमटा सुषमा अंधारे यांनी काढला.
भाजपा आणि टीम देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गेले काही महिन्यांपासून महापुरुषांचा अवमान, महाराष्ट्राची अस्मिता पायदळी तूडवण्याचा प्रयत्न होतोय. हा प्रकार ठरवून केला जात असून हा सुनियोजनाचा भाग आहे. हे षडयंत्र देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. देवेंद्रजी सभागृहात साधा निंदा जनक प्रस्ताव देखील मांडत नाहीत, असा आरोप त्यांनी केला.
गुजरातच्या निवडणुका सुरू असताना महाराष्ट्राचे उद्योग गुजरातमध्ये स्थलांतरित करायचे. कर्नाटकाच्या निवडणुका तोंडावर आहेत म्हटलं की महाराष्ट्रातली गावं कर्नाटकला जोडण्याचा प्रयत्न करायचा हे फार वाईट आहे. आजपर्यंत भाजप जातीजातीत भांडत लावत होती. धर्माधर्मात भांडण लावत होते. आता भाजप राज्याराज्यात भांडण लावत आहे. हे अत्यंत वाईट आहे. याला कारणीभूत देवेंद्रजींचे फुटीरतावादी राजकारण आहे, असा हल्लाही त्यांनी चढवला.
गुजरातच्या जनतेला महाराष्ट्राने एवढे सगळे उद्योग गिफ्ट दिलेले आहेत. महाराष्ट्राचे उद्योग गुजरातच्या जनतेला खुश करण्यासाठी उपयोगी पडले असतील तर चांगली गोष्ट आहे. आजही गुजरातला निवडणुका जिंकण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांचा व्हिडिओ वापरावा लागतो यातच आमचा विजय आणि भाजपची हार आहे, असा चिमटाही त्यांनी काढला.
शिंदे गटाने पैसा प्रचंड पेरला. प्रचंड माणसं तोडली. मात्र एवढी सगळी माणसं तोडून सुद्धा अजेंड्यावर काम करायला एकही माणूस नाही. म्हणजे सगळा गाव मामाचा, एक नाही कामाचा अशी त्यांची अवस्था आहे. त्यांच्याकडे अजेंड्यावर काम करण्यास एकही माणूस नसेल तर त्यांचा दोष काय? पैशांवर माणसं विकत घेता येऊ शकतात. पैशावर बुद्धी आणि निष्ठा विकत घेता येऊ शकत नाही, असा घणाघाती हल्ला त्यांनी चढवला.