ठाणे | 05 फेब्रुवारी 2024 : जितेंद्र आव्हाड यांना ध चा म करणं हे उत्तम जमतं. शरदचंद्र पवारसाहेब हे दीर्घायुषी होवोत. त्यांना उत्तम आरोग्य लाभो हीच आमची ईच्छा आहे. जितेंद्र आव्हाड अजित पवार यांच्यावर काहीतरी आक्राळ विक्राळ बोलत असतात. अजित पवार यांच्या नेतृत्वात अनेक आमदार आणि खासदार निवडून येतात. मात्र आव्हाड त्यांच्यावर फक्त टीका करतात. जितेंद्र आव्हाड हे नुसतं स्टंटबाजी करतात, असं म्हणत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर निशाणा साधला आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं एक वक्तव्य सध्या चर्चेत आहे. काही लोक माझी शेवटची निवडणूक म्हणून बारामतीमधल्या लोकांना आवाहन करतील. पण खरंच त्यांची शेवटची निवडणूक कधी होईल? हे माहिती नाही, असं अजित पवार यांनी म्हटलं. अजित पवारांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादीकडून त्यांच्यावर जोरदार टीका झाली. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी जोरदर टीका केली. अजित पवार शरद पवारांच्या मृत्यूची वाट पाहात आहेत का?, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला. त्यांच्या या टीकेला आता अजित पवार गटाकडून उत्तर देण्यात आलं आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी छगन भुजबळ यांच्या राजीमान्यावर प्रश्न विचारले. याच जितेंद्र आव्हाड यांच्यावर जेव्हा रिधा रशीद यांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. तेव्हा आव्हाड हे उद्विघ्न झाले. तेव्हा त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा हा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना का पाठवला? त्यांनी तो राजीनामा उपसभापती नरहरी झिरवळ यांना का पाठवला नाही? जितेंद्र आव्हाड हे नुसते स्टंट करतात, असा घणाघात आनंद परांजपे यांनी केला आहे.
उल्हासनगरमधील गोळीबाराच्या घटनेवर परांजपे यांनी भाष्य केलं. ही गोळीबारीची घटना चुकीची आहे. त्याचं समर्थन कोणी करू शकत नाही. पण ठाण्यात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन एक बैठक घ्यावी लागेल. हे वातावरण शांत करावं लागेल. हा संघर्ष थांबवायचं असेल तर मुख्यमंत्र्यांना यात पुढाकार घ्यावा लागेल. त्यामुळे हा तणाव लवकर निवळेल, असंही परांजपे म्हणाले.