ठाणे: ठाणे-नाशिक महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. ठाणे-नाशिक महामार्गावर 7 ते 8 किलोमीटरच्या रांगाच रांगा लागल्या आहेत. खड्ड्यांमुळे ही वाहतूक कोंडी झाल्याने नाशिककडे जाणाऱ्या आणि नाशिकहून ठाण्याकडे येणाऱ्या प्रवाशांची प्रचंड कोंडी झाली आहे. (thane caught in traffic snarls due to potholes)
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांना ठाणे-नाशिक महामार्गावर वाहतुकीचा सामना करावा लागला आहे. खड्ड्यांमुळे ही वाहतूक कोंडी झाली आहे. रस्त्याच्या बाजूच्या पट्ट्यांमध्येही खड्डे आणि चिखल झाला आहे. त्यामुळे या महामार्गावर 7 ते 8 किलोमीटरच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. या खड्ड्यांमधूनच वाट काढावी लागत असल्याने प्रवाशांची प्रचंड हालत झाली आहे. गेल्या तासाभरांपासून प्रवाशांना खड्ड्यात अडकून पडावेल लागले आहेत. वाहतुकीची कोंडी, पावसाची संततधार आणि रस्त्यावरील खड्डे आणि चिखल यामुळे प्रवाशांना गाडीतच अडकून पडावे लागले आहे. त्यामुळे प्रवाशांची प्रचंड चिडचिड झाली आहेत.
अनेकजण गणेशोत्सवानिमित्ताने नातेवाईकांकडे मुंबईला आले होते. दीड दिवसाच्या गणपतीचं विसर्जन केल्यानंतर हे प्रवासी आपल्या नाशिकडे रवाना झाले आहेत. त्यांच्यासोबत त्यांचं कुटुंबही आहे. अशातच त्यांना सकाळी सकाळीच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागल्याने या प्रवाशांमधून संताप व्यक्त होत आहे. एक तास उलटला तरी या प्रवाशांना ठाण्याच्याबाहेर पडता आलेलं नाही. त्यामुळे प्रवाशांचा पारा चढला आहे.
दरम्यान, सकाळपासून ठाणे-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्यानंतरही वाहतूक कोंडी हटवण्यासाठी वाहतूक विभागाचा एकही अधिकारी या ठिकाणी फिरकलेला नाही. त्यामुळे वाहतूक कोंडी कशी सुटणार? असा सवाल केला जात आहे. एमएमआरडीने या महामार्गाचं काँक्रिटीकरण करावं, चांगले रस्ते बनवावेत, पाऊस थांबल्याबरोबर एमएमआरडीएने हे काम हाती घ्यावं, अशी मागणी स्थानिक रहिवाशी करत आहेत. एमएमआरडीएने दोन तीनवेळा या रस्त्यावरील खड्डे बुजवले आहेत. मात्र, परिस्थिती जैसे थे आहे. त्यामुळे रस्त्याचे काँक्रिटीकरण हाच त्यावर एकमेव पर्याय आहे, असंही स्थानिकांचं म्हणणं आहे.
दरम्यान जुलैमध्येच अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी ठाण्यातील खड्ड्यांची पाहणी केली होती. माजीवडा मानपाडा प्रभाग समिती, तीन हात नाका, टिपटॉप प्लाझा, सेवा रस्ता लुईसवाडी, एलबीएस मार्ग आणि इतर ठिकाणांच्या रस्ते दुरुस्तीच्या कामाची पाहणी केली. तसेच कामाची गती व दर्जा याविषयी अभियंत्यांना सूचना दिल्या होत्या. मात्र, हा महामार्ग एमएमआरडीच्या अंतर्गत येत असल्याने एमएमआरडीएने महामार्गाचं काँक्रीटीकरण करण्याऐवजी केवळ खड्डे बुजवून काम भागवलं. त्यामुळेच पुन्हा या रस्त्यावर खड्डे पडल्याचं सांगितलं जात आहे.
दरम्यान, ठाणे महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सुरु असलेल्या नागला बंदर वॉटर फ्रंट डेव्हलपमेंट, पार्किंग प्लाझा कोव्हिड सेंटर तसेच गावदेवी पार्किंग कामाची महापालिका अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी पाहणी केली होती. विसर्जन घाट व दशक्रिया केंद्राचे काम 5 सप्टेंबर अखेर पूर्ण करण्याचे निर्देश देतानाच सर्वच कामांची गती वाढवून वेळेत प्रकल्प पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते. यावेळी नगरसेवक विकास रेपाळे, उप आयुक्त शंकर पाटोळे, मुख्य तांत्रिक अधिकारी प्रवीण पापळकर, कार्यकारी अभियंता मोहन कलाल, चेतन पटेल, विकास ढोले, संजय कदम आदी अधिकारी उपस्थित होते. (thane caught in traffic snarls due to potholes)
संबंधित बातम्या:
ठाण्यात ‘द बर्निंग कार’, पार्किंगमध्ये दोन दुचाकी आणि दोन चारचाकींनी घेतला अचानक पेट
गणपती बाप्पाचे विसर्जन करताना ठाणेकरांची ‘हरित शपथ’
(thane caught in traffic snarls due to potholes)