ठाणे : कोर्ट म्हटलं तारीख पे तारीख, असं स्टिरीओटाईम चित्र बघायला मिळतंय. पण यालाच छेद देणारी एक घटना समोर आली. ठाण्याच्या कौटुंबीक न्यायालयानं (Thane Family Court) अवघ्या तीस मिनिटांत एका दाम्पत्याचा घटस्फोट मान्य केला. दोघांच्या संमतीनं विभक्त झालेल्या या नवरा बायकोचं वयही फार होतं. नवऱ्याचं वय 73 वर्ष तर बायकोचं वय 65 वर्ष होतं. या दोघांनी विभक्त होण्यासाठी 9 मे रोजी अर्ज (Application for divorce) केला होता. त्यानंतर त्याच दिवशी या अर्जावर निर्णय होत, हे दोघं तत्काळ एकमेकांपासून वेगळेही झाले. मिड डेनं दिलेल्या वृत्तानुसार दुपारी 1.30 मिनिटांनी कोर्टात या दाम्पत्यानं घटस्फोटासाठी अर्ज केला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे कोर्टानं दुपारी दोन वाजता हा अर्ज मान्यही केला. दोघांच्या संमतीनं (Mutual consent) घटस्फोटासाठी अर्ज करण्यात आला होता. मिड-डेचे प्रतिनिधी अनुराग कांबळे यांनी दिलेल्या रिपोर्टनुसार, गेल्या दशकभरात झालेली ही ऐतिहासिक घटना आहे. अर्धा तासात घटस्फोट मान्य झाला असेलही. पण त्याआधी दहा वर्षापासून या दाम्पत्याचे वाद सुरु झाले होते.
घटस्फोट पत्नी 2012 पासूनच वेगळी राहायला लागलेली. पतीनं पोटगी द्यावी यासाठी पत्नीनं 2012 साली न्यायालयाची मदत घेतली घेतली होती. कायदेशीर लढाई दहा वर्षांपासून सुरु असताना, या दहा वर्षांच्या काळात तब्बल चार वेगवेगळ्या खटले एकमेकांविरोधात दाखल करण्यात आले होते.
सध्याच्या घडीला तरुणांमध्ये घटस्फोटाचं प्रमाण वाढलंय, अशी कुजबूज ऐकायला मिळतेय. हल्लीच्या पिढीबाबत एकमेकांपासून विभक्त होण्याच्या वाढलेल्या घटनांवर वेगवेगळ्या चर्चा होऊ शकतात. एका ज्येष्ठ दाम्पत्यानं एकमेकांपासून विभक्त होण्यासाठी दहा वर्षापासून जो न्यायलयीन लढा दिलाय, तो सहज आणि सोपा नसणार, हे देखील तितकंच खरं.
जेव्हा पतीविरोधात पत्नीनं खटला दाखल केला, तेव्हा पती आधीच ज्येष्ठ नागरिकांच्या यादीत मोडला गेला होता. ठाण्यातून दक्षिण मुंबईत खटल्याच्या सुनावणीसाठी येणं, या ज्येष्ठ नागरिकासाठी थकवणारं होतं. वाढलेल्या वयामुळे खटल्यासाठी होणारा प्रवास खडतर असल्याचा युक्तिवाद त्यांच्याकडून केला जात होतं. वर्षभर चाललेल्या या युक्तिवादानंतर या दाम्पत्याचं काऊन्सिलिंग करण्यात आलं. या काऊन्सिलिंगदरम्यान या दाम्पत्याच्या वकिलांनी त्यांना सामंजस्यानं घटस्फोट घेण्याचा सल्ला दिला. त्यासाठी अर्ज करण्यास सांगितलं आणि त्याप्रमाणे पुढील प्रक्रिया पार पडली.
नॅशनल लोक अदालतमध्ये 9 मे रोजी या दाम्पत्यानं घटस्फोटासाठी अर्ज केला. दीड वाजता अर्ज केला. दोन वाजता ते एकमेकांपासून विभक्तही झाले. एस.एन. रुकमे यांनी हा अर्ज मान्य करत या ज्येष्ठ दाम्पत्यानं घटस्फोटासाठी केलेला अर्ज निकाली काढला. घटस्फोट मिळाल्यानंतर पतीनं न्यायाधिशांचे आभारही मानलेत.
ज्येष्ठ नागरीक असलेल्या या पतीच्या वकिलांनी अशाप्रकारे घटस्फोटाचा निर्णय निकाली लागण्याची ही पहिलीच घटना असावी, असं म्हटलंय. फक्त व्यवहारासाठी लग्न टिकवणं अयोग्य असल्याचं मानत, कोर्टानं घटस्फोटाचा हा निर्णय न्यायलायनंही तत्काळ मान्य केला.