नवीन घर घेतलेलं, रजिस्ट्रेशनसाठी निघाला, पण डंपरने उडवलं, ठाण्यात पोलिसाचा करुण अंत

| Updated on: Jun 12, 2024 | 8:08 PM

ठाण्यात हिट अँड रन प्रकरणाची एक धक्कादायक घटना घडली आहे. एका ट्रक चालकाने दुचाकीवर असलेल्या पोलीस हवालदाराला अक्षरश: चिरडलं आहे. या अपघातात पोलीस हवालदारासह त्यांच्या पाठिमागे बसलेल्या महिलेचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे ठाणे शहर हादरलं आहे.

नवीन घर घेतलेलं, रजिस्ट्रेशनसाठी निघाला, पण डंपरने उडवलं, ठाण्यात पोलिसाचा करुण अंत
ठाण्यात हिट अँड रन, डंपरने पोलीस कॉन्स्टेबलला उडवलं, दोघांचा मृत्यू, मन हेलावणारी घटना
Follow us on

एका मालवाहतूक मोठ्या ट्रकने मोटारसायकलीला दिलेल्या धडकेमध्ये ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट पाचचे पोलीस हवालदार सुनील रावते आणि दुचाकीवर त्यांच्या सोबत जाणारी मिमा रामपूरकर या दोघांचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली. रावते यांच्या घटनेने ठाणे पोलीस वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे. अपघातानंतर मालवाहतूक ट्रक चालक पसार झाला आहे. त्याचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती वर्तकनगर पोलिसांनी दिलीय. अपघाताचा सीसीटीव्ही फुटेज आता समोर आला आहे.

सुनील रावते हे गेल्या काही वर्षांपासून ठाण्यातील सावरकरनगर भागात वास्तव्याला आहेत. त्यांनी वसंतविहार परिसरात नवीन घर खरेदी केले होते. याच घराच्या रजिस्ट्रेशनसाठी ते सकाळी घरातून सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास बाहेर पडले. निबंधक कार्यालयात घराची नोंदणी करण्यासाठी सहाय्य करणाऱ्या मिमा रामपूरकर या महिलेसह ते त्यांच्या मोटारसायकलीवरुन वर्तकनगरच्या दिशेने जात होते. त्याचवेळी त्यांच्या दुचाकीला कोरस टॉवरजवळ भरघाव वेगाने आलेल्या एका मालवाहतूक ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार मागून धडक दिली.

ट्रकचालक फरार

या अपघातामध्ये सुनील रावते आणि त्यांच्यासोबत असलेली महिला दोघेही गंभीर जखमी झाले. या दोघांनाही तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, या दोघांचाही मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या दोघांचेही मृतदेह ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. या अपघाताला कारणीभूत असलेल्या डंपर चालकाविरुद्ध वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी चालक हा फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.

सुनील रावते यांच्या पश्चात पत्नी, 17 वर्षांचा मुलगा आणि 10 वर्षांची मुलगी असा परिवार आहे. ठाणे शहर पोलीस दलात 2014 मध्ये पोलीस कॉन्स्टेबल म्हणून भरती झालेले रावते हे सध्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट पाचमध्ये कार्यरत होते. यापूर्वी ते पोलीस मुख्यालय, नौपाडा विभागाचे सहायक आयुक्त कार्यालयात नेमणूकीला होते. गुन्हे अन्वेषण विभागात त्यांनी गुन्हे उघड करण्यात मोलाची कामगिरी बजावली होती. त्यांच्या निधनमुळे एका चांगल्या, कर्तव्यनिष्ठ कर्मचाऱ्याला मुकल्याची भावना वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके आणि सहायक पोलीस निरीक्षक अविनाश महाजन यांनी व्यक्त केली.