ठाणे, शिवसेनेचे (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackrey) यांच्या विचारांशी एकनिष्ठ, प्रामाणिक राहणाऱ्या शिवसैनिकांना कोणी त्रास देण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना जशाच तसे उत्तर देण्यात येईल, असा इशारा शिवसेनेचे भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख रूपेश म्हात्रे (Rupesh Mhatre) यांनी शहापूर येथे एकनिष्ठ शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना दिला. एकनिष्ठ शिवसैनिक आजही आपल्यासोबत असून जे गेलेत त्यांचा विचार न करता आपण एकजुटीने पुन्हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी राहू, असे आवाहन उपजिल्हाप्रमुख शंकर खाडे यांनी या वेळी केले. मार्गदर्शन सभेप्रसंगी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत आम्ही कायम राहणार असल्याची ग्वाही शहापूर तालुक्यातील उपस्थित शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली. गुरुवारी युवासेना नेते आदित्य ठाकरे यांची शहापुरात मार्गदर्शन सभा होणार असून, त्यात बंडखोर पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात येणार असल्याचे त्यांनी या वेळी जाहीर केले.
शहापुरातील तळागाळातील प्रामाणिक व शिवसेना आहे त्या जागेवर असून, पंचायत समिती शहापूर येथील सभागृहात भिवंडी लोकसभा शिवसेना संपर्कप्रमुख रूपेश म्हात्रे यांच्या मार्गदर्शन सभेसाठी तालुक्यातील पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक व पक्षाचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.
रामदास कदम यांनी सोमवारी शिवसेना नेते पदाचा राजीनामा दिला तर दुसरीकडे शिंदे गटाकडून त्यांची याच पदी वर्णी लागली आहे. त्यामुळे आता नेमकी रामदास कदम यांची ओळख काय म्हणून असणार असा प्रश्न त्यांना करण्यात आला होता. मात्र, आपण बाळासाहेब ठाकरे यांचा कडवट शिवसैनिक होतो आणि भविष्यातही राहणार. शिवाय त्यांनीच मला हे पदही दिले होते. त्यामुळे माझी ओळख ही बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक अशीच असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. बदलत्या राजकीय परस्थितीमुळे हा निर्णय घ्यावा लागत असला तरी आपण आगोदर शिवसैनिक आणि नंतर सर्वकाही अशीही प्रतिक्रिया कदमांनी शिवसेना पक्षातून हकालपट्टी केल्यानंतरही दिली आहे.