देशातील एक नंबरच्या उद्योगपतीच्या घरी अमित शाह, प्रफुल पटेल , शरद पवार आणि मी आम्ही एकत्र बसायचो. पाच ते सहा वेळा आमची त्यावेळी भाजपासोबत जाण्याची चर्चा झाली. कुणाला मंत्रीपद द्यायचं हे देखील ठरलं. मुंबईत आल्यानंतर वरिष्ठांनी निर्णय बदलला. पण पुढे मी शब्द पाळत 2019 ला भाजपसोबत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, असं म्हणत अजित पवार यांनी काल पहाटेच्या शपथविधीचा पट उलघडला. यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी यावर भाष्य केलं आहे. आव्हाड यांनी ठाण्यात पत्रकार परिषद घेतली.
शरद पवार यांनी कोणालाही कधीही शब्द दिला नव्हता. चर्चा करू याचा अर्थ निर्णय झाला नाही. शरद पवारांना तर टीव्हीवरून समजलं होतं. कशाला त्यांचं नाव घेता? भावनांचं राजकारण कशाला करत आहेत. महागाई, शेतकरी, जातिवाद धर्मवाद यावर बोलूया… उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आहे त्यांनी यावर सांगावं. चर्चा काय झाली यासंदर्भात महाराष्ट्रला देणंघेणं नाही. पुरोगामी महाराष्ट्र टिकणार की नाही हा प्रश्न आहे. पुरोगामी महाराष्ट्र टिकवण्याचं काम शरद पवारांनी केलं आहे. तुम्ही मोक्यातील आरोपी सोडू शकतात, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
कुटुंबातून फक्त तुम्हाला संधी द्यायची का? तुम्हाला संधी दिली तर महाराष्ट्राने सर्व पाहिलं आहे. महाराष्ट्र विसरलेला नाही तुमचे गद्दारी आणि तुमचं शेवटचं भाषण कधी होणार आहे. तुम्ही जशी काय अंत्ययात्राचीच वाट बघत आहेत. महाराष्ट्र भाषण विसरला नाही आणि विसरणार देखील नाही. इतका घाण भाषण आपल्या बापाबद्दल हे राजकारणात कोणी केलं नसेल, असं म्हणत आव्हाडांनी अजित पवार यांच्यावर टीकास्त्र डागलं.
आमच्याकडे अनेक निस्वार्थी चेहरे आहेत. राहुल गांधीला संधी मिळाली तर त्यांना पाठिंबा देऊ. शरद पवारांना संधी मिळाली तर आम्ही त्यांना पाठिंबा देऊ. भिवंडी या लोकसभा मतदारसंघामध्ये चांगलं वातावरण आहे. काँग्रेसचे खालचे-वरचे कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत. समज-गैरसमज असतात. सर्व मिळून आम्ही कामाला लागलो आहे, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.