ठाणे, रक्षाबंधन केलेल्या हातावर राखी बांधून केईम रुग्णालयात (KEM) अनोखे रक्षाबंधन अनुभवायला मिळाले. कोविड काळात पहिल्यांदाच हात प्रत्यारोपणाची (transplanted arm) शस्त्रक्रिया केईएममध्ये करण्यात आली होती. ती यशस्वी झाली असून 22 वर्षांचा रुग्ण आता प्रत्यारोपण केलेल्या हाताने आपली दैनंदिन कामे करू लागला आहे. त्याचा सर्वाधिक आनंद केईएम रुग्णालयात व्यक्त होत आहे. सर्वच विभागांत आनंदाचे वातावरण आहे. काल रक्षाबंधनानिमित्त याच तरुणाच्या हातावर राखी बांधण्यात (Tie Rakhi) आली. त्याच्यावर शस्त्रक्रिया केलेल्या डॉक्टरांनीच बहिणीच्या रूपात त्याला अनोखी भेट दिली. गेल्यावर्षीसुद्धा प्रत्यारोपण केलेल्या हातावर राखी बांधली होती मात्र त्यावेळी तरुणाचा हात पूर्णपणे बॅण्डेजमध्ये होता. आता एका वर्षानंतर त्याच्या हातात पूर्ण संवेदना आल्या आहेत.
तो आपली दैनंदिन कामे त्याच हाताने करू लागला आहे. डॉ. पुरी (Dr. Puri) यांनी या वर्षीही त्याला राखी बांधली, पण आता त्याचा हात सामान्यांसारखा आहे, याचाच सर्वाधिक आनंद होत असल्याची प्रतिक्रिया देताना त्यांचा चेहरा उजळून गेला होता. शस्त्रक्रियेसाठी आणि त्याबाबतच्या संपूर्ण प्रक्रियेत सर्वच विभागांचा पाठिंबा मिळाला. माजी अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली प्रत्यारोपणाची प्रक्रिया सुरू होती. प्रत्यारोपणापर्यंत न॒ थांबता डॉक्टरांनी त्याच्या भविष्याचाही विचार केला आहे, असे डॉ. पुरी म्हणाल्या.
वर्षभरापूर्वी मध्य प्रदेशातून आलेला संबंधित तरुण केईएम रुग्णालयात हाताच्या प्रतीक्षेत होता. एका ब्रेनडेड तरुणाच्या नातेवाईकांनी अवयवदानाचा निर्णय घेतल्यानंतर त्याचे हात प्रत्यारोपणासाठी केईएममध्ये पाठवण्यात आले. त्यानंतर 18 ते 24 तासांच्या शस्त्रक्रियेनंतर त्याला उजवा हात मिळाला. केईएम रुग्णालयाचे ते पहिलेच हात प्रत्यारोपण ठरले. एक वर्ष तरुणावर फिजिओथेरपी आणि इतर उपचार सुरू आहेत. आता त्याच्या संपूर्ण हाताला संवदेना आहेत. शिवाय त्याची बोटेही काम करत आहेत. त्याने आता संगणकाचा क्लासही लावला आहे. तो आता चित्रही काढतो आणि लिहितोसुद्धा. अवयव दान हे किती महत्वाचे आहे हे या उदाहरणावरून दिसून येते.