निनाद करमरकर, माथेरान : माथेरानच्या (matheran) आकर्षणाचा केंद्रबिंदू असणाऱ्या माकडांचा सकाळी तडफडून मृत्यू झाल्याचं निदर्शनास आल्यावर स्थानिकांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे. या माकडांचा मृत्यू (moncky death) उष्माघाताने झाला? की त्यांच्यावर कुणी विषप्रयोग केला? याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. पर्यटक तिथं गेल्यानंतर माकडांना खायला देतात, तर कधी त्यांचे फोटो काढतात. काही जणांनी माकडासोबत रिल्स तयार केले आहे. सोशल मीडियावर तिथल्या माकडांचे अनेक व्हायरल (viral video) रिल्स सुध्दा तुम्हाला पाहायला मिळतील. रात्रीच्यावेळी विषप्रयोग केल्याचा संशय तिथल्या स्थानिकांनी व्यक्त केला आहे.
माथेरान रेल्वे स्टेशन विभागात सकाळच्या दरम्यान सात ते आठ लहान मोठी माकडे बेशुद्ध अवस्थेत आढळून आली होती. एकूण आठ माकडांपैकी दोन माकडे तडफडत होती, तर उर्वरीत सहा माकडे अगोदरच मृत्यूमुखी पडलेली होती. तिथल्या स्थानिकांनी त्यांना पाणी पाजण्याचा प्रयत्न केला. परंतु काहीही इलाज होऊ शकला नाही. रात्रीच्यावेळी या माकडांवर कुणी विषप्रयोग तर केला नाही ना ? की अन्य काही कारणांमुळे यांचा मृत्यू झाला आहे ? अशा चर्चा सध्या जोरात सुरु आहेत. मृत्यू पावलेल्या माकडांना वनखात्याच्या अधिकारी वर्गाने शवविच्छेदन करण्यासाठी नेले असून शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर ह्या माकडांचा मृत्यू कोणत्या कारणामुळे झाला आहे, हे स्पष्ट होईल अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते, माथेरान, चंद्रकांत सुतार यांनी दिली.
ज्या माकडाचा मृत्यू झाला आहे, त्या माकडांचे मृतदेह वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहेत. त्यांचं शवविच्छेदन केल्यानंतर संपूर्ण प्रकरण उजेडात येईल असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. हे प्रकरण सगळीकडं व्हायरल झालं आहे. अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. त्याचबरोबर दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी देखील केली आहे.