ठाणे : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनादेखील कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. डॉ. विपीन शर्मा (Dr. Vipin Sharma) यांना ठाण्यातीलच एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. मागील काही दिवसांपासून आयुक्त शर्मा हे अनेक बैठकांना उपस्थित होते, तसेच मागील आठवड्यात मंत्रालयातदेखील कोरोना संदर्भातील बैठकीला त्यांनी हजेरी लावली होती. (Thane Municipal Commissioner Dr. Vipin Sharma tested Corona positive)
डॉ. विपीन शर्मा यांची मागील वर्षी ठाणे महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. कोरोना संसर्गाची पहिली आणि आताच्या दुसऱ्या लाटेत त्यांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून काम केले. मागील अनेक महिन्यापासून डॉ. शर्मा यांनी पालिका आधिकरी आणि लोकप्रतिनिधी यांच्या सहकार्याने कोरोनाला आळा घालण्यासाठी काम केले. मात्र आता कोरोनासदृश लक्षणं जाणवू लागल्याने त्यांनी स्वत:ची कोरोना चाचणी करुन घेतली. त्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.
काही दिवसांपूर्वी पालिका आयुक्तांनी लसीकरणांतर्गत कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला होता. तसेच यावेळी त्यांनी देशातील लसी सुरक्षित असून नागरिकांनासुद्धा लस घेण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर कोरोना प्रतिबंध मोहीम तसेच इतर शासकीय कामानिमित्त डॉ. शर्मा हे अनेकांच्या संपर्कात आले. कोरोनासदृश लक्षणं जाणवू लागल्याने त्यांनी कोरोना चाचणी करुन घेतली. यावेळी त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली.
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादूर्भाव सातत्याने वाढत आहे. येथे एका दिवसात जिल्ह्यात 3 हजार 144 कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या 3 लाख 12 हजार 705 वर पोहोचली आहे. त्यामध्ये 2 लाख 77 हजार 536 रुग्ण हे डिस्चार्ज झाले आहेत. सध्या 28 हजार 715 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहे. तर आतापर्यंत ठाण्यात आतापर्यंत 6 हजार 454 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात मृत्यू दर 2.6 टक्क्यावर पोहोचला असून हा आकडा धोक्याची घंटा मानला जातोय.
दरम्यान, संबंधित डॉक्टरांनी आयुक्त शर्मा यांना आराम करण्याचा सल्ला दिला असून लवकरच शर्मा बरे होऊन पुन्हा आपल्या कामाला लागतील असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
इतर बातम्या :
Indian Railways: प्रवाशांनो, कृपया लक्ष द्या; आता रेल्वेत मोबाईल, लॅपटॉप चार्जिंग विसरा!
(Thane Municipal Commissioner Dr. Vipin Sharma tested Corona positive)