ठाणे, रस्त्यावरील खड्डे आणि जड वाहने बंद पडत असल्यामुळे गेली दोन आठवडे ठाणे-नाशिक (Thane Nashik road) आणि घोडबंदर रोडवर वाहतूक कोंडी (Traffic Jam) होताना दिसत आहे. घोडबंदर ते मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या अवजड वाहनांमुळे याचा फटका ठाणेकरांना बसत आहे. मागील आठवड्यापासून ज्या प्रमाणे वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. अशीच कोंडी आज देखील निर्माण झाली आहे. मागील चार ते 5 तासांपासून 3 किलोमिटरपर्यंत रांगा लागल्या होत्या. आता धीम्या गतीने वाहतूक सुरू आहे. मुंबई नाशिक महामार्गावरील साकेत पूल आणि खारेगाव टोलनाका मार्गावर पडलेल्या खड्यांमुळे काल दुपारी साकेत पूल ते हात नाका उड्डाणपूल आणि भिवंडीतील मानकोली पुलापर्यंत वाहतूक कोंडी झाली होती.
शहरातील काही अंतर्गत मार्गांवरही पावसामुळे वाहनांचा वेग मंदावला होता. तर, वाहतूक कोंडी सोडविताना पोलिसांच्या नाकी नऊ आले होते. मुंबई नाशिक महामार्गावरील साकेत पूल आणि खारेगाव टोलनाका भागात ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे गेल्याकाही दिवसांपासून ठाणेकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. शनिवारी आणि रविवारी पावसाचा
जोर कमी असल्याने राज्य रस्ते विकास महामंडळाने येथील खड्ड्यांवर तात्पुरती खडी टाकून खड्डे बुजविले होते, मात्र काल दुपारी पडलेल्या जोरदार पावसामुळे या भागात पुन्हा खड्डे पडले.
त्यामुळे ठाण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या रस्त्यावर साकेत पूल ते तीन हात नाका उड्डाणपूलापर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. तर, भिवंडी, नाशिकहून ठाण्याच्या दिशेने वाहतूक करणार्या मार्गिकेवर खारेगाव टोलानाका ते भिवंडीतील मानकोलीपर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. मुंब्रा बाह्यवळण मार्गाहून ठाण्याच्या दिशेने वाहतूक करणार्या मार्गावरही त्याचा परिणाम झाला. वाहन चालकांना अवघ्या 15 मिनिटांचे अंतर पार करण्यास सुमारे पाऊण तास लागत होता. तर, शहरातील कोपरी पूल, कोर्टनाका, कळवा, बाजारपेठ भागातही काहीकाळ वाहतूक कोंडी झाली होती.
मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर संबंधित यंत्रणांनी रस्त्यावरील खड्डे भरणीची कामे हाती घेतली आहेत. दगड आणि मातीच्या साहाय्याने खड्डे भरणीची कामे केली जात आहेत. मात्र, पाऊस पडताच माती वाहून जाण्याबरोबरच दगड बाहेर येत आहेत. यामुळे दगड-मातीची मलमपट्टी प्रवाशांसह वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे. त्याचबरोबर याठिकाणी वाहनांचा वेग मंदावत असल्याने कोंडीत भर पडत आहे. ठाणे जिल्ह्यात गेल्या काही महामार्गांवरील खड्ड्यांमुळे वाहनांचा वेग मंदावल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. मुंब्रा बाह्यवळण मार्ग, मुंबई-नाशिक महामार्ग, घोडबंदर, शीळफाटा या
मागावर वाहनांच्या लांब रांगा लागत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश ठाणे जिल्हा प्रशासनाला दिले होते.