गणेश थोरात, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, ठाणे | 23 ऑक्टोबर 2023 : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार होतं. तेव्हा आम्ही मराठा आरक्षण दिलं होतं. आम्ही आरक्षण आणलं. पण तुम्ही ते वाचवू शकला नाहीत. आरक्षण संदर्भात पहिली मागणी आम्हीच केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुसऱ्यांवरती टीका करण्यापेक्षा आरक्षण द्यायचं असेल तर त्यांनी ते द्यावं. 288 आमदार यांना एकत्र करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कडे जाऊ. लोकसभेत 16 टक्के आरक्षण द्या, म्हणून मागणी करू, असं जितेंद्र आव्हाड म्हणालेत.
मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत संविधानिक पदावर असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला गावात येऊ देणार नाही, अशी भूमिका मराठा समाजाने घेतली आहे. राज्यात ठिकठिकाणी राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. यावरही जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या संदर्भात गावकरी कशी वागतीलय या बाबत कोणाचा अधिकार नाही. त्यामुळे सरकारचे मंत्री गावात जर जाऊ शकले नाहीत तर हा सरकारचा मोठा पराभव आहे. आम्ही लोकांच्या बाजूने उभे आहोत, असं जितेंद्र आव्हाड म्हणालेत.
पैठण ड्रग्ज प्रकरणी कारवाई झाली आहे. यावरही जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ड्रग्समुळे अनेक घरं आणि तरुण बरबाद होत आहेत. एवढं ड्रग्स येतं कुठून? पोलीस करत काय आहेत? उडता पंजाब नाही तर महाराष्ट्र उडायला लागला आहे. पुढच्या 10 वर्षात महाराष्ट्रातील पोरं ड्रग्जमध्ये फसलेली असतील. हा दोष पोलिसांचा आहे ,पोलिस रोखू शकत नाही पकडून शकत नागी हा पोलिसांचा अपयश आहे, असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी शिंदे सरकारवर घणाघात केला आहे.
ड्रग्जवर योग्य ती कारवाई होत नाही. अनेक ठिकाण ड्रग्जचं रॅकेट चालवलं जात आहे. आम्ही सांगून सुद्धा पोलीस कारवाई करत नाही. इन लिगल ड्रग्स विकला जातो. त्याप्रमाणे इन लीगल बांधकाम देखील मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अनेक वेळा तक्रार केल्या असून सुद्धा कुठलीही कारवाई होत नाही पालिकेकडून देखील योग्य ती कारवाई केली जात नाही. आम्ही बोलून बोलून वैतागलो आहेत. पण यावर कारवाई होत नाही, असं जितेंद्र आव्हाड म्हणालेत.