सुनील जाधव, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी ठाणे | 22 ऑक्टोबर 2023 : शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडणार आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर एक उद्धव ठाकरे यांचा आणि दुसरा एकनाथ शिंदे यांचा असे शिवसेनेचे दोन दसरा मेळावे पार पडतात. ठाकरे गटाच्या टीझरमधून शिंदे गटावर तोफ डागण्यात आली आहे. यावरून शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी ठाकरे गटावर टीका केली आहे. हलक्या मनाचे कुचक्या वृत्तीचे आतल्या गाठीचे आणि शिवसेनेपासून दूर गेलेलं नेतृत्व आज आमच्यावर टीका करत आहेत. पण आपणच हिंदुत्वाच्या विचारांपासून पलायन केलेलं आहे. आपणच पळकुटे आहात, असं म्हणत ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याच्या टीझरवर नरेश म्हस्के यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे काँग्रेसच्या विरोधात तोफ डागत होते. त्यांच्याच सोबत आज तुम्ही आहात. बाळासाहेबांच्या खऱ्या विचारांचा मेळावा हा आझाद मैदानावर होणार आहे, आमचा मेळावा खऱ्या अर्थाने शिवसेनेचा मेळावा असणार आहे. वारसा हा खऱ्या विचारांचा असायला हवा सडक्या मनोवृत्तीचा नको, ओरिजनल विचार शिवसेनाप्रमुखांचे आमच्याकडे आहेत, आझाद शिवसैनिकांचा आझाद मेळावा हा आझाद मैदानावर असणार आहे, असं म्हणत नरेश म्हस्के यांनी ठाकरे गटावर टीका केली आहे.
ज्या शिवसैनिकांनी शिवसेना स्थापन होताना या समाजवादी आणि कम्युनिस्ट पक्षाशी लढा दिला होता. त्यात कित्येक लोकांचे बळी गेले. त्यांच्याशी आपण आघाडी करता आपण शत्रूला भेटणारे आहात. तेव्हा तुम्हाला लाज वाटली नाही. बाळासाहेबांच्या विचारांपासून दूर जाताना लाज वाटली नाही? संजय राऊत कायम रडत राहतात. दसऱ्या मेळाव्यात तुम्ही सावरकरांच्या बाजूने बोलणार आहात. हिंदुत्वाच्या बाजूने बोलणार आहात. काँग्रेसच्या विरोधात बोलणार आहात याचं पहिलं उत्तर द्या, असं म्हणत नरेश म्हस्के यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला आहे.
निवडणुका लढताना शिवसेना-भाजप युती म्हणून लढली आणि खुर्ची करता विरोधकांसोबत तुम्ही गेलात. शिवसेना भाजपच्या युतीतून पळून जाऊन काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर युती करता त्यामुळे आपण पळकुटे आहात, असा घणाघात नरेश म्हस्के यांनी केला आहे.