ठाणे | 04 नोव्हेंबर 2023 : राज्यातील ड्रग्जच्या तस्करी प्रकरणावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. त्यांच्या या टीकेला शिवसेना आमदाराने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. आजकाल संजय राऊत यांना लोकांचं काय चाललंय हे पाहायचं असतं. संजय राऊत स्वत: कोणत्या हॉटेलमध्ये कोणाबरोबर थांबायचे हे जर आम्ही बोललो. तर मग तुम्हाला कळेल ते कोणत्या हॉटेलवर संजय राऊत थांबल्यावर त्यांच्या हॉटेलची बिलं कोण भरायचं… जे आज तुमच्या नावाने रडतायेत तेच तुमच्या हॉटेलची बिल भरायचे, असा घणाघात संजय शिरसाट यांनी संजय राऊत यांच्यावर केला आहे.
कृपया राजकारणामध्ये वैयक्तिक गोष्टींवर जाऊ नका. ड्रग्ज सेवन कुठेही कुठल्याही खासदाराने केलेलं नाही. त्याबद्दल तुम्ही जो गैरसमज पसरवत आहात. तो चुकीचा आहे. आपलं झाकून ठेवून इतरांवर जर तुम्ही आरोप करत असाल तर त्याचं पुरावा सहित चोख उत्तर दिलं जाईल. हॉटेलच्या नावासहित रूम नंबर सहित सर्व देऊ शकतो, असा घणाघात संजय शिरसाट यांनी केला आहे.
एल्विश यादव याच्यावर काही लोकांनी आरोप करायचा प्रकार केलेला आहे. मी जर गुन्हेगार असेल तर माझ्यावर कारवाई करा, असं स्वतः अल्विश यादवने सांगितलं आहे. हिंदुत्वावर बोलणारा लोकप्रिय असणारा माणूस त्याच्यावर कुठलेही आरोप करतोय. त्याला कुठल्याही बाबीत अडकवायचं हा प्रकार काही लोक करत आहेत. राऊत आणि त्यांच्या ठाकरे गटाने हिंदुत्व तर सोडलेलंच आहे. परंतु हिंदुत्वावर जो बोलेल त्याच्यावर सुद्धा कारवाई करण्याची मागणी हे लोक करत आहेत, असं म्हणत संजय शिरसाट यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.
एल्विश यादव जर आरोपी असेल तर निश्चित त्याच्यावरती कारवाई करा. कधीही आम्ही त्याचं समर्थन करणार नाही. परंतु बळजबरी आरोपी बनवणं, हा जो काही प्रकार सुरू केलेला आहे, हे बरोबर नाही. म्हणून आम्ही त्याचं समर्थन करत नाही. पण जर तो आरोपी नसेल तर निश्चित आम्ही त्याचं समर्थन करू, असंही शिरसाट म्हणाले.