ठाणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल उध्वस्त झालेल्या तळीये गावाची पाहणी केली तर आज चिपळूणच्या विदारक परिस्थितीची पाहणी करुन आपत्तीग्रस्त कोकणवासीयांना धीर दिला. यावेळी कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही. सगळ्यांना मदत केली जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. इकडे ठाणे शिवसेनेच्या वतीनेही बाळासाहेबांच्या शिकवणीला अनुसरुन कोकणातील 25 हजार कुटुंबियांना मदत पाठवण्यात येत आहे. (Thane Shivsena helping From the Disaster people From Konkan)
कोकणातील महाड चिपळूण या ठिकाणी पूर परिस्थिती आणि दरड कोसळून अनेक घरांचे नुकसान झाले असून यामध्ये अनेक जाणांना आपला जीव देखील गमावला आहे. अशा या परिस्थितीत जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यातच विविध ठिकाणाहून या पूरग्रस्त विभागाला मदत होत असताना ठाण्यातून देखील मोठी मदत शिवसेना ठाणे जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी पाठवण्यात येत आहे.
जवळपास 25 हजार कुटुंबियांना मदत ठाणे जिल्हा शिवसेनाच्या वतीने पाठवण्यात येत आहे. यात जीवनावश्यक वस्तू म्हणून तांदूळ, डाळ, साखर, तेल इत्यादी खाद्यपदार्थांचा समावेश असून या शिवाय 25 हजार ब्लॅंकेट, साड्या, टॉवेल इत्यादींसारख्या वस्तूंचा देखील समावेश आहे. कोकण प्रमाणेच महाराष्ट्रातील इतर ठिकाणीदेखील शिवसेना ठाणे जिल्हा च्या वतीने मदत पुरवली जाणार आहे.
‘राष्ट्रवादी आपल्यासोबत’ या अभियानामार्फत महाडच्या आपत्तीग्रस्तांसाठी राष्ट्रवादीकडून मदतीचा पहिला टेम्पो महाडच्या दिशेने रवाना झाला आहे. खालापूरवरुन राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हा मदतीचा टेम्पो महाडच्या दिशेने पाठवला. राज्याचा समृद्ध भाग आज प्रचंड अडचणीत असताना आपल्या मदतीची त्यांना गरज आहे, असं सांगत राष्ट्रवादीच्या युवक कार्यकर्त्यांनी मदतीचा टेम्पो महाडकडे पाठवला.
धान्य, कपडे, ब्लँकेट, औषध, सॅनेटरी, फुड पॅकेट्स, बिस्किट, दूध, मिनरल वॉटर अशी मदत पाठवण्यात आलेली आहे. महाडमध्ये गेल्यानंतर स्थानिक सांगतील त्या ठिकाणी ही मदत पोहोचवली जाईल, असं राष्ट्रवादी युवक काँँग्रेसकडून सांगण्यात आलंय.
कोकण आणि त्याच्या आसपासच्या परिसरात पावसाने रौद्र रूप धारण करत थैमान घातलं आहे. आपल्या राज्याचा हा समृद्ध भाग आज प्रचंड अडचणीत आणि संकटात सापडला आहे. ही वेळ आहे आता आपल्या बाह्या सरसावण्याची… कोकण आणि पूरग्रस्त बांधवांना मदतीला धावून जायची… महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी आणि हितचिंतकांनी आपल्या कोकण भूमी साठी कंबर कसायची आहे, असं आवाहन राष्ट्रवादीकडून करण्यात आलंय.
“मुसळधार पाऊस, ढगफुटी, पूरस्थिती आणि दरडी कोसळून राज्याच्या विविध भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेकांचे प्राण गेले असून हजारो लाखो लोक पुरामुळे बेघर झाले आहेत. राज्य सरकार बाधित लोकांना मदत करत असून काँग्रेस कार्यकर्त्यांनीही आपल्या परीने शक्य ती सर्व मदत करावी”, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले.
(Thane Shivsena helping From the Disaster people From Konkan)
हे ही वाचा :
राष्ट्रवादीकडून आपत्तीग्रस्तांसाठी मदतीचा पहिला टेम्पो महाडच्या दिशेने रवाना
लाखो लोक पुरामुळे बेघर, काँग्रेस कार्यकर्त्यांनी पूरग्रस्तांना शक्य ती मदत करावी : नाना पटोले