ठाणे : डोंबिवलीमधील एका इमारतीमधून शनिवारी रात्रीच्या सुमारास अचानक रहिवासी एकामागोमाग एक घराबाहेर पळू लागले. गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. नेमकं काय झालं, याची बऱ्याच नागरिकांना कल्पना नव्हती. लवकर घराबाहेर या असे आवाज परिसरात घुमत होते. याच दरम्यान शनिवारी रात्री या घटनेसंदर्भातला एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. आता ही इमारत पाडकाम सुरू करण्यात आलं आहे. अशी माहिती केडीएमसी प्रशासनाने दिली. डोंबिवली लोढाहेवन परिसरातील शांती उपवन सोसायटीमध्ये ही घटना घडली. रात्रीच्या सुमारास इमारतीला तडे जाऊन माती पडत असल्याची गोष्ट काही रहिवाशांच्या लक्षात आली. त्यांनी आरडाओरडा करायला सुरवात केली. काही नागरिक बाहेर आले. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दल, वॉर्ड अधिकारीसुद्धा दाखल झाले.
इमारतीची माती पडत असल्याने इमारती राहणाऱ्या 250 कुटुंबाला पालिका अधिकारी व अग्निशामक दल कर्मचारी यांनी इमारतीच्या बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी हलवले. सध्या 250 लोक रस्त्यावर आली आहेत. पालिका प्रशासनाने त्यांच्या जेवणाची राहण्याची व्यवस्था केली आहे. मात्र आता पुढे काय करायचं? असा प्रश्न या रहिवाशांसमोर निर्माण झाला आहे. शनिवारी रात्री हा प्रकार घडला. रविवारी सुट्टीचा दिवस. मात्र सोमवारी मुलांच्या शाळा सुरू होणार असल्याने मुलांना शाळेत पाठवायचं कसं? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
मी स्वयंपाक करत होते आणि मुलगी हॉलमध्ये अभ्यास करत होती. तेव्हा हॉलला हळूहळू सगळीकडे तडा जाऊ लागला. आम्ही घाबरलो आणि बाहेर पळालो. असं एका महिला रहिवाशाने सांगितलं. समोरच्या फ्लॅटला पूर्णपणे तडे गेल्याचं आम्ही पाहिलं. सगळीकडे आरडाओरडा सुरू झाला. एकेक करून नागरिक आहे, तसे बाहेर निघाले. आमच्यासोबत काहीच सामान नाही, अशी व्यथा इथल्या रहिवाशांनी मांडली. रविवारी दुपारी या इमारतीचे पाडकाम करायला पालिकेने सुरवात केली आहे. नागरिकांच्या राहण्याची, खाण्याची व्यवस्थादेखील करण्यात आली आहे. पण आता कायमस्वरूपी राहायचं तर जायचं कुठे हा एकच हा प्रश्न सध्या रहिवाशांना बेचैन करत आहे.