ठाणे : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून पिण्याची पाईप लाईन टाकण्याचं काम अंबरनाथच्या खुंटवली परिसरात सुरू आहे. खुंटवलीच्या पनवेलकर होम्स गृहसंकुलमध्ये पिण्याची पाईपलाईन टाकली जात आहे. परंतु, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी हे काम अचानक बंद केले. यामुळे शिंदे गटाचे पदाधिकारी संतप्त झाले. शिंदे गटाचे कार्यकर्ते आणि स्थानिक रहिवासी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयावर गेले. तिथं धडक देत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. त्यानंतर अधिकाऱ्यांना चिल्लर आणि बांगड्या भेटवस्तू देऊन आपला संताप व्यक्त केला. पिण्याच्या पाईपलाईनचे काम सुरू करा, अशी मागणी केली.
अंबरनाथच्या पश्चिम भागात पनवेलकर होम्स गृह संकुल आहे. या गृहसंकुलामध्ये पिण्याच्या पाण्याचे पाईपलाईन टाकण्यात येत होती. मात्र आज या पाईपलाईनचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अचानकपणे बंद केले. त्यामुळे संतप्त झालेल्या शिंदे गटातील शहर संघटक विकास सोमेश्वर आणि स्थानिक रहिवाशांनी यांनी थेट महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयात धडक दिली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला.
विकास सोमेश्वर यांनी प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यावेळी विकास सोमेश्वर यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. तुम्ही कुणाला घाबरून हे काम बंद पाडता का? तुमच्यावर राजकीय स्थानिक लोकांचा दबाव आहे का?, अशा प्रश्नांची सरबत्ती केली. यामुळे अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले. ही पाईपलाईन अत्यंत महत्त्वाची आहे. लोकांशी संबंधित आहे. त्यामुळे हिचे काम लवकर सुरू करावे, असं शिंदे गटाचे पदाधिकारी म्हणत होते.
मात्र यावर अधिकाऱ्यांकडून कोणतेही उत्तर मिळाले नाही. त्यामुळे विकास सोमेश्वर यांनी थेट बांगड्या आणि चिल्लर अधिकाऱ्यांना भेटवस्तू म्हणून दिल्या. पाण्याच्या पाईपलाईनचे काम सुरू करा. अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांना देण्यात आला. त्यामुळे आता या पाईपलाईनचे काम सुरू होणार, याची वाट स्थानिक नागरिक पाहत आहेत.
सोमेश्वर म्हणाले, मी चार महिन्यांपासून येतो. तरीही काम होत नाही. चिल्लर पैसे अधिकाऱ्यांच्या टेबलवर ठेवले. तसेच पैसे हवे की बांगड्या हव्या, असा सवालही केला.