डोंबिवली : पार्टनरसोबत काही दिवसांपासून पटत नसल्याने गिफ्ट शॉपच्या मालकाने स्वतःचे वेगळे दुकान सुरु करण्याचा निर्णय घेतला. यात दुकानात ठेवण्यासाठी त्याने पार्टनरशीपमध्ये असलेल्या दुकानातून लाखोंचा ऐवज लुटला. पोलिसांनी खाक्या दाखवताच 13 लाखाच्या चोरीचा तिढा सुटला. विष्णुनगर पोलिसांना गिफ्ट शॉपमधील 13 लाखाच्या चोरीचा छडा लावण्यास यश आले असून आरोपीला अटक केली आहे.
डोंबिवलीतील विष्णुनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रुई कलेक्शन नावाचे गिफ्ट शॉप आहे. सुशांत आंग्रे आणि अजिंक्य वनारसे हे दोघे या दुकानाचे पार्टनर आहेत. गेल्या काही दिवसापासून आंग्रे आणि वनारसे यांच्यात सतत कुरबुरी सुरु होत्या. त्यामुळे अजिंक्य वनारसे याने दिव्यात स्वतःचे दुकान सुरु करण्याचा निर्णय घेतला. या दुकानात ठेवण्यासाठी वनारसे वस्तू पाहिजे होत्या. मात्र आर्थिक कुवत नसल्याने त्याने पार्टनरशीपमध्ये रुई कलेक्शन दुकानातून वस्तू चोरण्याचे ठरवले आणि आपली ही योजना अंमलातही आणली.
रुई कलेक्शनचे दुसरे पार्टनर सुशांत आंग्रे यांनी मंगळवारी नेहमीप्रमाणे दुकान उघडले. दुकान उघडताच समोरील नजारा पाहून सुशांतला धक्का बसला. दिवाळीनिमित्त दुकानात लाखो रुपयांचा माल भरण्यात आला होता. मात्र मंगळवारी दुकान उघडले तेव्हा यातील लाखोंचा माल गायब होता. दुकानात चोरी झाल्याचे निदर्शनास येताच दुकानाचे मालक सुशांत आंग्रे आणि अजिंक्य वनारसे यांनी तात्काळ विष्णुनगर पोलिसात धाव घेत चोरीची तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी दुकानाला भेट देत घटनास्थळाची पाहणी करीत चोरीचा तपास सुरु केला.
तपासादरम्यान पोलिसांना दुकानाचा पार्टनर अजिंक्य वनारसे याचे वागणे संशयास्पद वाटले. त्यानुसार पोलीस अधिकारी गणेश वदने यांनी वनारसे याच्याकडे या प्रकरणाची चौकशी सुरु केली. मात्र तो काहीही सांगण्यास तयार नव्हता. अखेर पोलिसांनी खाक्या दाखवताच वनारसेने सर्व घटना पोलिसांसमोर कथन केली. पार्टनर सुशांत आंग्रेशी पटत नसल्याने स्वतःचे वेगळे दुकान सुरु केले. या दुकानात ठेवण्यासाठी या वस्तू चोरल्याच कबुली वनारसेने दिली. यानंतर पोलिसांनी अजिंक्य वनारसेला अटक केली असून त्याच्याकडून चोरीचा मालही हस्तगत केला आहे. याप्रकरणी विष्णुनगर पोलीस पुढील कारवाई करीत आहेत. (Theft of Rs 13 lakh from shop partner in Dombivali)
नागपूरात बाईक चोरणाऱ्या गुन्हेगाराला अटक, 17 गाड्या जप्त, मौज मस्तीसाठी करायचा चोरी
इन्स्टावर ओळख, परदेशात पायलट असल्याचं सांगून पुणेकर महिलेला 10 लाखांना गंडा