डोंबिवलीतील एमआयडीसीमध्ये झालेल्या स्फोटाला आज तीन दिवस पूर्ण होत आहेत. गेल्या तीन दिवसांपासून या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. यावरून या स्फोटाची तीव्रता किती मोठी होती हे सहज लक्षात येतं. या स्फोटात आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाल्याचं अधिकृतपणे सांगण्यात आलं आहे. तर स्फोटातील अनेक लोक अजूनही बेपत्ता असून त्यांचा काहीच तपास लागलेला नाही. या मजुरांचे कुटुंबीय रोज घटनास्थळी येऊन आपल्या नातेवाईकाचा मृतदेह सापडतो का? याची वाट पाहताना दिसत आहेत. दरम्यान, हे रेस्क्यू ऑपरेशन कधीपर्यंत चालेल यांची काहीच माहिती देण्यात आलेली नाही. पण रेस्क्यू ऑपरेशन शेवटचा व्यक्ती सापडेपर्यंत सुरूच राहणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
एनडीआरएफच्या टीमने घटनास्थळी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं आहे. एनडीआरएफचे जवान सारंग कुर्वे यांनी या रेस्क्यू ऑपरेशनबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. जोपर्यंत शेवटचा मिसिंग व्यक्ती सापडत नाहीये, तोपर्यंत आमचे सर्च ऑपरेशन सुरूच राहणार आहे. या ठिकाणी अजूनही रासायनिक पदार्थ आहेत. काही ठिकाणी आग धुमसते आहे. त्यामुळे धोका आहे. पण आम्ही ते सांभाळून काम करत आहोत. रेस्क्यू ऑपरेशन करताना आग लागली तरी अग्निशमन दल आहे, अशी माहिती सारंग कुर्वे यांनी दिली.
दरम्यान, आज सकाळपासून या ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू होतं. पण दुपारनंतर चार तास अमुदान कंपनीतील सर्च ऑपरेशन बंद करण्यात आलं. त्यामुळे मृतांचे नातेवाईक आणि नागरिक प्रचंड संतापले. नागरिकांनी पोलीस आणि एनडीआरएफच्या जवानांवर संताप व्यक्त केला. या नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी करून पोलिसांना धारेवर धरलं. त्यानंतर या ठिकाणी पुन्हा एकदा सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलं.
या स्फोट प्रकरणाचा तपास करण्यासाठी स्पेशल टास्क फोर्स तयार करण्यात आला असून त्यांच्याकडे हा तपास सोपवण्यात आला आहे. या टास्क फोर्समध्ये ठाणे खंडणी विरोधी पथक आणि ठाणे गुन्हे शाखेचा समावेश आहे. ठाणे खंडणी विरोधी पथक आणि गुन्हे शाखेने मलय मेहता आणि मालती मेहता यांना या प्रकरणी अटक केली आहे. त्यानंतर या दोघांनाही कोर्टात हजर करण्यात आले होते.
कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा शोध घेण्यासाठी फायर ब्रिगेड, एनडीआरएफ आणि पोलिसांकडून तीन दिवसांपासून या कंपनीमध्ये सर्च ऑपरेशन सूरु आहे. आज दुपारनंतर या कंपनीच्या ढिगार्याखाली मृतदेहाचे अवशेष सापडले. मृतदेहांचे अवशेष महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. या अवशेषांवरुन मृतदेहांची ओळख पटविण्यासाठी स्फोटाच्या पश्चात बेपत्ता झालेल्यांच्या नातेवाईकांचे डीएनए टेस्ट करुन सॅम्पल घेतले जात आहे. नातेवाईकाचा डीएनए मृतदेहाशी जुळल्यास मृत व्यक्तीची ओळख पटणं सोपं होणार आहे.