ठाणे : देशासह राज्यात महागाईचा (Inflation) भडका उडाला आहे. महागाई गगनाला भिडली आहे. पेट्रोल (Petrol), डिझेलपासून ते खाद्यतेलापर्यंत आणि अन्नधान्यापासून ते भाजीपाल्यापर्यंत सर्वच वस्तुंचे दर वाढले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना जगायचं कसं असा प्रश्न पडलाय. भाजीपाल्याच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत असून, टोमॅटने शंभरी गाठली आहे. तर इतर भाजीपाल्यांच्या (Vegetables) दरात देखील मोठी वाढ झाली आहे. मात्र यात दिलासादायक बाब म्हणजे ठाणे, पनवेल, पेण, रोहे, पाली येथील बाजारपेठांमध्ये गावरान भाज्यांची आवक वाढल्याने गावरान भाज्यांचे दर कमी झाले आहेत. गावरान भाज्या स्वस्तात मिळत असल्याने गृहिणींना मोठा आधार मिळाला आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. उन्हाळ्यामध्ये आधीच भाज्यांची आवक कमी असते. भाज्यांची आवक कमी आणि मागणी जास्त यामुळे भाज्याचे दर वाढतात. मात्र यंदा भाज्यांचे दर प्रचंड प्रमाणात वाढल्याने गृहिणींना घर चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये ठाणे, पनवेल, रायगडमधील भाजी मार्केटमध्ये गावरान भाज्यांची आवक वाढली आहे. गावरान भाज्यांची आवक वाढल्याने दर देखील स्वस्त झाल्याचे पहायला मिळत आहेत. मुंबई आणि ठाण्याच्या भाजी मार्केटमध्ये पुणे आणि नाशिकमधून भाज्यांची आवक होते. मात्र सध्या या भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. तर दुसरीकडे गावरान भाज्यांची आवक वाढली आहे. पुणे, नाशिकमधून ठाण्यात येणाऱ्या टोमॅटोचे दर 80 रुपये प्रति किलो आहेत. तर तेच गावरान टोमॅटो सध्या पन्नास ते चाळीस रुपये दराने मिळत आहेत. गावरान वांगी, घोसाळी, भेंडी या सर्वांचे दर कमी असल्याने महिलांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून भाज्यांचे दर चांगलेच कडाडल्याचे दिसून येत आहेत. उन्हाळ्यात भाज्यांची आवक घटते, मात्र मागणी कायम राहात असल्याने भाजीपाला महाग होतो. यंदा भाजीपाल्याने महागाईचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. टोमॅटो तर शंभर रुपये किलोवर पोहोचले आहेत. भेंडी, गवार यासारख्या भाज्यांसोबतच पालेभाज्यांच्या दरात देखील मोठी वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. भाजीपाल्याचे दर वाढतच असल्याने गृहिनींचे किचन बजेट कोलमडले आहे.