कल्याण : गेल्या काही दिवसात पावसाने राज्यात जोरदार हजेरी लावली आहे. पाऊस आणि मध्य रेल्वेचं विळ्या भोपळ्याचं नातं आहे असं चित्र कायम पाहायला मिळतं. जोरदार पावसात मध्य रेल्वेची रेल्वेची वाहतूक खोळंबणं किंवा वेळापत्रक कोलमडणं नेहमीचंच झालं आहे. पण हा रेल्वे प्रवास कल्याणमधील कुटुंबासाठी दुर्दैवी ठरला. कल्याण पत्रीपूल भागात बुधवारी मन हेलावणारी घटना घडली. रेल्वे खोळंबल्याने बाळाच्या आईसह आजोबांनी रुळावरून चालत जात प्रवास करण्याचं ठरवलं आणि होत्याचं नव्हतं झालं. रेल्वे ट्रॅकवरील एक नाला पार करताना आजोबांच्या हातून बाळ निसटलं आणि थेट नाल्यात पडलं.
हैदराबादमध्ये राहणारी योगिता रुमाले आपल्या बाळासोबत आई वडिलांच्या घरी भिवंडीत आली होती. बाळाच्या उपचासाठी मुंबईतील वाडिया रुग्णालयात घेऊन जाण्याचं ठरलं. त्यासाठी ती आपले वडील ज्ञानेश्वर पोगूल यांच्यासोबत घरातून निघाली. अंबरनाथ लोकल पत्रीपूलाजवळ थांबली होती. काही तास थांबल्याने पुढचा प्रवास होणार नाही, असं दोघांना वाटलं. त्यामुळे त्यांनी ट्रेनमधून उतरून पाय कल्याणपर्यंत पायी जाण्याचा निर्णय घेतला. दरम्यान आजोबांच्या हातून बाळ नाल्यात पडलं.
यावेळी ट्रॅकवरून जाणाऱ्या लोकांनी बाळाला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण पाण्याचा वेगामुळे बाळ वाहून गेलं. दोन दिवस उलटून गेल्यानंतर बाळाचा अजून थांगपत्ता लागलेला नाही. या घटनेनंतर पहिल्यांदाच बाळाच्या आजोबांनी प्रतिक्रिया दिली आहे. घटनेच्या दिवशी नेमकं काय झालं होतं? याबाबत त्यांनी सांगितलं आहे.
“आम्हाला कोपरला उतरायचं होतं. पण लोकल कल्याण स्थानकाजवळ थांबली. आम्ही 12 वाजता निघालो होतो पण ट्रेन काही तास डोंबिवली कल्याण खाडीवर थांबून होती. आम्ही कल्याण स्टेशनवर चालत जाण्याचा निर्णय घेतला. ट्रेनमधून उतरल्यानंतर पहिल्यांदा मुलगी योगिता घसरून पडली. मी तिला कसं बसं उचललं आणि तिच्याकडचं बाळ माझ्याकडे घेतलं. तसेच पुढे चालू लागलो. वाटेवरून जाताना पाय घसरत होता. त्यात मी रेनकोट घातला होता. पाय घसरला आणि सावरताना बाळ हातून नाल्यात पडलं. “, असं बाळाच्या आजोबांनी सांगितलं.
“बाळाला गेल्या सहा महिन्यापासून आम्ही तपासणीसाठी वाडिया रुग्णालयात घेऊन जात होतो. त्या दिवशी नेमकी तपासणीची तारीख मिळाली. त्यासाठी आम्ही घरातून निघालो. ट्रेन कल्याण डोंबिवली दरम्यान खूप वेळ थांबली होती आणि लोकं उतरून पुढे जात होते. आम्हीही तसंच ठरवलं. भिवंडीत जर आरोग्य सुविधी व्यवस्थित असत्या तर आज अशी वेळ आली नसती. “, असंही त्यांनी पुढे सांगितलं.