VIDEO | कल्याणमध्ये ओव्हरटेकच्या नादात तरुणाचा बळी; घटना सीसीटीव्ही कैद

| Updated on: Aug 14, 2021 | 4:21 PM

तीसगाव नाका परिसरातही त्याने पुढील रिक्षा आणि ट्रकला ओव्हरटेकला करण्याचा प्रयत्न केला. या नादात त्याची बाईक स्लीप झाली. त्यामुळे मागून येणाऱ्या ट्रकच्या मागच्या चाकाखाली चिरडून तो ठार झाला.

VIDEO | कल्याणमध्ये ओव्हरटेकच्या नादात तरुणाचा बळी; घटना सीसीटीव्ही कैद
कल्याणमध्ये ओव्हरटेकच्या नादात तरुणाचा बळी
Follow us on

कल्याण : वाहनधारकांच्या सुरक्षेसाठी बनवलेले नियम मोडणे अनेकदा जीवावर बेतत असल्याचे प्रकार निदर्शनास येतात. असे असतानाही बेदरकारपणे वाहन चालवण्याचा नाद तरुणांना सोडवत नसल्याचे पुन्हा एका घटनेवरून उघडकीस आले आहे. कल्याण पूर्वेकडे इतर गाड्यांना ओव्हरटेक करण्याच्या नादात तरुणाने प्राण गमावल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. सीसीटीव्ही फुटेज पाहणाऱ्यांना धडकी भरवणारा हा अपघात आहे. वारंवार अशा प्रकारचे जीवघेणे अपघात घडूनही तरुण मंडळी ड्रायव्हिंग करताना अतिरेक का करतात, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. (Young man dies after overtaking truck in kalyan)

कल्याण पूर्वेकडील तीसगाव नाका परिसरात पुणे लिंक रोडवर शुक्रवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. मंधाता मिश्रा असे मृत बाईकस्वार तरुणाचे नाव आहे. तो कल्याणवरून आपल्या बाईकने उल्हासनगरच्या दिशेने चालला होता. बाईक वेगात चालवण्याबरोबरच तो इतर गाड्यांना ओव्हरटेक करीत होता. तीसगाव नाका परिसरातही त्याने पुढील रिक्षा आणि ट्रकला ओव्हरटेकला करण्याचा प्रयत्न केला. या नादात त्याची बाईक स्लीप झाली. त्यामुळे मागून येणाऱ्या ट्रकच्या मागच्या चाकाखाली चिरडून तो ठार झाला. ही दुर्दैवी घटना परिसरातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून त्याचे फुटेज समोर आले आहे. अपघाताचा हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत असून अशा बेदरकार ड्रायव्हिंगबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. या अपघातप्रकरणी कल्याणच्या कोळसेवाडी पोलिसांनी अपघाताला कारणीभूत ठरलेल्या ट्रक चालकाला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास सुरु आहे.

तरुण डोंबिवलीचा रहिवासी

मंधाता हा डोंबिवली पश्चिम भागात राहत होता. त्याला दोन मुले आणि पत्नी असा परिवार आहे. तो एका खाजगी कंपनीत कामाला होता. ज्यावेळी त्याचा अपघात झाला, त्यावेळी तो उल्हासनगरला नक्की कोणत्या कामासाठी चालला होता हे अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणाचा तपास कोळसेवाडी पोलिस ठाण्याचे अधिकारी डी. गोळे करीत आहे. मंधाताच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी पोलिसांनी ट्रक चालक मोतीलाल भानूलाल यादव याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्याला अटक करुन न्यायालयापुढे हजर करण्यात आल्याची माहिती गोळे यांनी दिली आहे.

पुणे लिंक रोडवर अलीकडच्या काळात वाहतुकीचे प्रमाण वाढले आहे. ट्रक-टेम्पोसारख्या मोठ्या वाहनांचीही मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. त्यात बाईकस्वार सुसाट बाईक चालवून स्वतःच्या तसेच पादचाऱ्यांच्या जीविताला धोका निर्माण करीत आहेत. त्यांना रोखायचे कसे, असा प्रश्न आता पोलीस यंत्रणेपुढेही उभा ठाकला आहे. (Young man dies after overtaking truck in kalyan)

 

इतर बातम्या

सोलापुरात पुन्हा म्हशी पळविण्याचा कार्यक्रम, हजारो लोकांची गर्दी, कोरोना नियमांना हरताळ

916 सोने म्हणजे काय आणि 22 कॅरेट सोन्यापेक्षा किती वेगळे?, खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या