मुरबाड: ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड तालुक्यातील शिरवली ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सारिका बारकु आगिवले या तरुणीची निवड झाली आहे. सारिका ही अवघ्या 21 वर्षांची आहे. त्यामुळे तिने राज्यातील सर्वात लहान सरपंचांच्या पंक्तीत बसण्याचा मान मिळवला आहे. सारिकाची सरपंचपदी निवड झाल्यानंतर गावात आनंदाचे वातावरण आहे. (youngest sarpanch in murbad maharashtra village)
सरपंचपदाच्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर सारिकानेही आनंद व्यक्त केला. मी माझ्या शिक्षणाचा गावाच्या विकासासाठी उपयोग करेन, अशी प्रतिक्रिया सारिका आगिलवे हिने दिली.
नुकत्याच पार पडलेल्या मुरबाड ग्रामपंचायती सरपंचपदाच्या निवड प्रक्रियेनंतर अनेक दावे-प्रतिदावे करण्यात आले. विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी गावच्या सरपंचांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत. त्यानंतर प्रत्येक राजकीय पक्षाकडून संबंधित ग्रामपंचायती आपल्या ताब्यात असल्याचा दावा केला जात आहे.
मुरबाड जिल्ह्यातील ग्रामपंचायतींवर कोणाची सत्ता याची चर्चा सोशल मीडियावरही रंगली आहे. अनेक राजकीय नेत्यांनी ग्रामपंचायतीवर आपल्या पक्षाचा झेंडा फडकावण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. या पार्श्वभूमीवर शिरवलीसह इतर गावातील ग्रामस्थांनी कोणत्या पक्षात जायचे हा निर्णय आम्ही घेऊ, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे आता आगामी काळात मुरबाड जिल्ह्यात काय घडणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
पुण्याच्या दौंड तालुक्यातही 21 वर्षांच्या स्नेहल संजय काळभोर हिची सरपंचपदी निवड झाली. त्यानंतर तिची गावातून घोड्यावरून मिरवणूक काढण्यात आली. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील सर्वात कमी वयाची सदस्य म्हणून स्नेहल काळभोर खडकी ग्रामपंचायतीच्या सदस्यपदी पहिल्यांदा निवडून आली होती. आता बोनस म्हणजे तिच्या गळ्यात सरपंचपदाची माळ पडल्याने सर्वात तरुण सरपंच होण्याचा मानही स्नेहल काळभोरला मिळाला आहे.
स्नेहल संजय काळभोर ही MCA च्या दुसऱ्या वर्षाचं शिक्षण घेत आहे. काल झालेल्या सरपंच-उपसरपंचपदाच्या निवडणुकीत स्नेहलची सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर सरपंच-उपसरपंचांची गावातून घोड्यावरून मिरवणूक काढण्यात आली. आपल्या शिक्षणाचा गावाच्या विकासासाठी वापर करुन अधिकाधिक कामे मार्गी लावण्याचा मानस स्नेहल काळभोर हिने व्यक्त केला आहे.
अहमदनगरमध्ये पहिल्यांदा नवरा-बायको बिनविरोध सदस्य झाले आणि आता थेट सरपंच-उपसरपंच बनून गावचा कारभार हाकणार आहेत. जयश्री सचिन पठारे (Jayashreee Sachin Pathare) या सरपंच तर त्यांचे पती सचिन पठारे (Sachin Pathare) हे उपसरपंच झाले आहेत. त्यामुळे नगर जिल्ह्यात या दोघा नवरा बायकोच्या राजकीय यशाची चर्चा रंगली आहे. वाळवणे ग्रामपंचायत सदस्यावर आता नवरा-बायको अधिकार गाजवणार आहेत.
निवडणुकीनंतर सरपंच पदासाठी ओबीसी महिला आरक्षण जाहीर झाल्याने हा मान जयश्री पठारे यांना मिळाला असून गावाने त्यांचे पती सचिन पठारे यांना उपसरपंच करायचं ठरवलं आहे. त्यामुळे दोघेही आता सरपंच आणि उपसरपंचपदावर विराजमान झाले आहे. (Pune Daund Snehal Kalbhor Youngest Gram Panchayat Sarpanch)
यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत भीमराव माने यांच्या नेतृत्वाखालील गटाने 17 पैकी 14 जागांवर दणदणीत विजय मिळवला. इतकंच नव्हे तर यंदा भीमराव माने यांनी स्वतःबरोबर आपल्या पत्नीला सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते आणि दोघा पती-पत्नीचा विजयही झाला. तर यंदा ग्रामपंचायतीचे सरपंच आरक्षण हे खुला महिला गट पडल्याने माने गटाने भिमराव माने यांच्या पत्नी अनिता माने यांना सरपंच आणि भीमराव माने यांची उमेदवारी निश्चित केली होती. पार पडलेल्या सरपंच आणि उपसरपंच पदाच्या निवडणुकीत माने दाम्पत्यांची बिनविरोध निवड झाली आहे.
(youngest sarpanch in murbad maharashtra village)