अहमदनगर : अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अनेक आमदार उपस्थित होते. परंतु, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपण या निर्णयाशी सहमत नाही असे सांगत अजित पवार यांच्याविरोधात भूमिक घेतली. त्यामुळे शपथविधीला उपिस्थत असणाऱ्या अनेक आमदारांचे धाबे दणाणले होते. नेमकी कुठली भूमिक घ्यावी अशा मनस्थितीत काही आमदार होते. अखेर, त्यांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली होती. याच तटस्थ आमदारांपैकी एका आमदाराने अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.
अकोला मतदारसंघाचे आमदार किरण लहामटे यांनी अखेर अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. मी अजित दादांबरोबरच असे त्यांनी स्पष्ट केले आहे. अजितदादांच्या शपथविधीला मी उपस्थित होतो. मात्र, त्यानंतर भावनिक होऊन शरद पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. परतुं, अजितदादा की शरद पवार हा निणर्य न झाल्यामुळे तटस्थ राहण्याची भूमिका घेतली होती.
शरद पवार यांच्याबद्दल मनात आदर आहे. परंतु, मतदारसंघातील जनता मला विकास कामाबद्दल जाब विचारणार आहे. शेवटी राजकारण करायचे असते विकास कामांसाठीच. जर मतदारसंघात निधी मिळाला नाही आणि जनतेची कामे झाली नाही तर जनता मला जाब विचारेल.
2019 ला अजितदादांनी मला विधानसभेची उमेदवारी दिली. महाविकास आघाडी सरकारमध्ये अर्थमंत्री असताना त्यांनी माझ्या मतदारसंघासाठी चार वर्षात आठशे ते नऊशे कोटींचा निधी दिला. निधी देण्याचे काम हे अजितदादा यांच्याकडूनच होऊ शकते. त्यामुळे जनतेच्या मतांचा आदर करून अजितदादा यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला असे आमदार किरण लहामटे म्हणाले.
शरद पवार यांच्यासोबत पुन्हा काही चर्चा झाली नाही. अजित पवार यांच्यासोबत माझी बांधिलकी आहे. मी कालही पिचड विरोधक होतो आणि आजही पिचड विरोधक आहे. यापूर्वी माझा जो अजेंडा होता तोच काय राहणार आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.