मुंबई | 3 नोव्हेंबर 2023 : मनोज जरांगे पाटील याचं आंदोलन स्थगित झालं. मराठा समाजाला आरक्षण देण्यात ज्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती ते कालच्या शिष्टमंडळात होते. मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देण्यासाठी शिंदे, फडणवीस सरकार कटिबद्ध आहे. जरांगे पाटील यांनी एक वंशावळ समोर ठेवली. कोणाकोणाला आरक्षण देता येईल यासंदर्भात त्यांनी भूमिका मांडली आहे. त्यांनी ज्या गोष्टी समोर मांडल्या आहेत त्याची पूर्तता आम्ही करणार आहोत. मनोज जरांगे पाटील यांचं त्यासाठी कौतुक आहे. ते खूप सवेदनशील आहेत. तारखेचा जो गोंधळ होतो त्यानुसार त्या सांगितल्यानुसार सरकार काम करेल अशी ग्वाही राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली.
राज्यातील काही जिल्ह्यात आणखी कुणबी नोंदी सापडल्या आहेत. शिंदे समिती त्यावर काम करत आहे. वंशावळ आढळेल तसे प्रमाणपत्र देण्याची कारवाई आम्ही करत आहोत. जे गुन्हे दाखल झाले आहेत ते मागे घेण्यासंदर्भातही सरकार भूमिका घेणार आहे. या आंदोलनाच्या मागे काही लोकांचे वेगळे मनसुबे होते. पण, आता आंदोलन थांबल्यामुळे ते धुळीस मिळाले आहेत, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला बदनाम करण्याचा डाव होता का असा प्रश्न निर्माण होतोय अशी शंका त्यांनी व्यक्त केली. आम्ही शिष्टमंडळ घेऊन संभाजीनगरला जात होतो तेव्हा त्याच एयरपोर्टवरून काही लोक डेहराडूनला गेले असा गौप्यस्फोट त्यांनी केला. डेहराडूनला कोण गेलं याची माहिती माझ्याकडे आहे. ती मी दोन दिवसात समोर ठेवेन. मी ही जेव्हा लंडनला गेलो होतो तेव्हाही तिकीट कोणी काढलं असं म्हणत आरोप करण्यात आले अशी टीका त्यांनी केली.
मराठा समाजाचे अनेक मुख्यमंत्री झाले होते. पण, टिकणारे आरक्षण देण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांनी केलं. जे हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टातही एक वर्ष टिकलं. नंतर सरकार बदलल्यानंतर ते टिकले नाही. ४० वर्षात मराठा समाजाला आरक्षण देण्याचा प्रयत्न कोणी केला नाही. परंतु, या सरकारमध्ये आम्ही टिकणारे आरक्षण लवकरात लवकर कसे देता येईल यासाठी प्रयत्न करणार आहोत. जरांगे पाटील यांनी सांगितलेल्या वेळेत त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत असेही ते म्हणाले.
मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी ओउन्हा दोन दिवसांनी जाणार आहे. त्यांच्या प्रकृतीसाठी जाणार आहे. त्यांच्या ज्या मागण्या आम्ही मान्य केल्या आहेत त्या सचिवांकडून लिहीत पत्र प्राप्त झाल्यास त्या देखील सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न करू. जरांगे पाटील यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहे की नाही हे आम्हाला माहित नाही. ती माहिती घेण्याची वेळ आलेली नाही. मात्र, जो माणूस सगळ्यांसाठी आंदोलन करतो तो स्वतःला लाभ घेण्यासाठी काही करत नाही. मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन समाजासाठी होते. त्यावर आता सरकार काम करत आहेत, असेही मंत्री सामंत म्हणाले.
शरद पवार साहेबांच्या स्वभावाचा आदर्श लोकानी घेतला पाहिजे. टीका करणाऱ्यांनी ते लक्षात घ्यावं. एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्रजी आणि अजितदादा यांचे हे सरकार आहे. एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र जी यांच्यावर टीका करुन झाली. पण अजितदादांचं काय? सोयीस्कर टिका केली जाते. देवेंद्रजींनी आरक्षण देऊन दाखवलं आणि शिंदे साहेबांनी निजामकाळातल्या नोंदी शोधून दाखवल्या आहेत असे त्यांनी स्पष्ट केले.