मुंबई : 31 ऑगस्ट 2023 | ज्या 106 हुतात्म्यांवर गोळीबार केले ते काँग्रेसच्या नेतृत्वातील सरकारने केले. त्या 106 हुतात्म्यांच्या रक्ताचे हात काँग्रेसचे आहेत. आता उद्धवजींच्या पक्षाला ते हात लागले आहेत. राष्ट्रवादी तेव्हा नव्हतीच. 106 हुतात्म्यांचे रक्त सांडण्याचे काम आणि पाप हे काँग्रेस आणि उद्धवजींच्या शिवसेनेचे आहे. नीती आयोगाबाबत प्रश्न विचारणार असतील तर आमचं त्यांना स्पष्ट उत्तर आहे. मूर्खांच्या नंदनवनात उबाठा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आहे अशी टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी केली आहे.
2047 पर्यंत भारताच्या विकासातील उद्दिष्ट ही शहराच्या विकासाशिवाय होऊ शकत नाही. कारण शहर ग्रोथ हब आहेत. शहराच्या विकासावर देशाचा विकास अवलंबून आहे. म्हणून निती आयोग थिंक टँक म्हणून सहकार्य आणि मार्गदर्शन महाराष्ट्र सरकारला करणार आहेत. त्यामुळे निती आयोगातून दिल्लीवरून कोणीतरी येऊन इतर काहीतरी बदल करणार आहे ही छिद्रानवेशी भूमिका आहे, अशी टीका त्यांनी केली.
नीती आयोग सहकार्य आणि मार्गदर्शन करणार आहे तर संपूर्ण योजना कार्यान्वित राज्य सरकार करणार आहे. त्याचे ग्रोथ सेंटर एमएमआर असणार. केंद्र सरकार त्यात निधी देणार, मुंबईचा असा विचार पहिल्यांदाच केंद्र सरकार करत आहे. या मुद्द्यांवर तुम्ही निवडणुकीत आमच्यासमोर या असे आव्हानही त्यांनी विरोधकांना दिले. तसेच, उबाठा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मूर्खांच्या नंदनवनात जगणारी लोक आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.
शहर ग्रोथ हबमध्ये वीस शहरे निवडली जाणार आहेत. त्या वीस शहरांमध्ये पहिल्या चारमध्ये मुंबई आहे. नीती आयोगाने अन्य चार शहरे निवडली असती तर मुंबईला का नाही निवडलं? मुंबईच्या बाबतीत तकलादू भूमिका? विरोधी भूमिका अशी विरोधकांनी कोल्हेकुई केली असती. त्यांना आज बोलायला जागा नाही म्हणून खोटे बोलत आहेत, असे ते म्हणाले.
जयंत पाटील यांचा मुंबईशी संबंध काय? त्यांचे मुंबईकरांशी लेन देन काय आहे? जयंत पाटील यांचा अभ्यास कच्चा आहे आणि त्यांचे भाषण असत्य आहे असा टोला त्यांनी लगावला.
एमएमआर म्हणजे केवळ मुंबई महानगरपालिका नाही तर त्यात नऊ अन्य महानगरपालिका आहेत. मग नऊ महानगरपालिका देशापासून वेगळी करणार असे मुर्खांसारख्या विधान करणाऱ्यांना बे अक्कल म्हणावे नाहीतर काय? उल्हासनगर, ठाणे, मीरा-भाईंदर ही देशापासून वेगळा होणार आहे का? असा सवाल त्यांनी केला.