मुंबई । 3 ऑगस्ट 2023 : राज्यामध्ये विविध ठिकाणी, रस्त्यावर आढळून येणाऱ्या बेवारस मनोरुग्णाबद्दल राज्याच्या आरोग्य विभागाने एक मोठा निर्णय घेतला आहे. असा बेवारस मनोरुग्णांना विविध सुविधा देतानाच त्यांच्यासाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थांनाही राज्य सरकारने आवाहन केले आहे. येत्या १५ ऑगस्टपर्यंत बेवारस मनोरुग्णांवर उपचार करण्यासंदर्भात नवी नियमावली तयार करण्यात यावी असे आदेश आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी प्रशासनाला दिले आहेत.
राज्यातील विविध शहरांमध्ये मोठ्याप्रमाणात बेवारस मनोरुग्ण सापडत आहेत. मात्र, अशा बेवारस रुग्णांना योग्य वेळेत मिळत नाहीत. त्यांना रुग्णालयात दाखल करून घेण्यासाठी जाचक अटींचा सामना करावा लागतो. तसेच, यापूर्वी फक्त दुपारी १२ वाजेपर्यंतच अशा बेवारस मनोरुग्णांना मनोरुग्णालयात दाखल करुन घेतले जात असे.
पुण्यातील तसेच पिंपरी-चिंचवड येथे बेवारस मनोरुग्णांसाठी स्माईल प्लस सोशल फाउंडेशन ही संस्था काम करत आहे. या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची भेट घेऊन या रुग्णांच्या समस्यांचे निराकरण करण्याची मागणी केली.
यावेळी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी राज्यातील मनोरुग्णालय २४ तास सुरू ठेवून कोणत्याही क्षणी मनोरुग्णाला रुग्णालयात दाखल करुन घ्या असे आदेश प्रशासनाला दिले. कोर्टाची प्रक्रिया सांभाळा परंतु बेवारस मनोरुग्णांना उपचारासाठी विलंब होऊ नये याची काळजीही घ्या, असे त्यांनी सांगितले.
राज्यातील कुठल्याही शहरात बेवारस मनोरुग्ण सापडल्यास त्याला रुग्णवाहिकेच्या माध्यमातून तेथून मनोरुग्णालयात पाठवण्याची व्यवस्था करा. अशा रुग्णांची माहिती मिळाल्यास त्याच्यावर उपचार होण्यासाठी लवकरच हेल्पलाईन सेवा सुरु केली जाईल. तसेच, १५ ऑगस्टपूर्वी त्या रुग्णावर उपचारासाठी नवी नियमावली तयार करण्याचे आदेशही आरोग्यमंत्र्यांनी दिले.