दिनेश दुखंडे, टीव्ही 9 मराठी, मुंबई : महाराष्ट्राच्या शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रासह संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांचं मोठं योगदान आहे. त्याच हिरे कुटुंबाच्या तिसऱ्या पिढीचे वारसदार असलेले अद्वय हिरे हे शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहे. काही दिवसांपूर्वी अद्वय हिरे यांनी विचार सभा घेऊन भाजपला सोडचिठ्ठी दिली होती. मालेगाव शहरासह ग्रामीण भागात हिरे यांचा मोठा दबदबा आहे. नाशिक जिल्ह्यात शैक्षणिक आणि सहकार क्षेत्राच्या माध्यमातून हिरे कुटुंबाचा दांडगा जनसंपर्क आहे. याच कुटुंबातील अद्वय हिरे यांचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश होणार असल्याने शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांना क्षह देण्यासाठी हा प्रवेश महत्वाचा ठरणार आहे. उद्धव ठाकरे यांनी अद्वय हिरे यांचा प्रवेश करून भाजपाला मोठा धक्का देत भविष्यात शिंदे गटाचे मंत्री असलेल्या दादा भुसे यांच्या विरोधात अद्वय हिरे हे राजकीय आखाड्यात उभे राहणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे.
ठाकरे गटातून अनेक जण शिंदे गटात जात आहे. तर काही भाजपमध्ये प्रवेश करत आहे त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाचा खडतर काळ सुरु असल्याचे बोललं जात आहे.
अशातच भाजपमधून थेट शिवसेना ठाकरे गटात अद्वय हिरे हे प्रवेश करत असल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होऊ लागली आहे.
हिरे कुटुंबाच्या राजकीय प्रस्थाला काही वर्षांपूर्वी सुरुंग लावलेल्या दादा भुसे यांच्या विरोधात अद्वय हिरे हे उमेदवार असणार असल्याने मालेगावमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
गेल्या काही दिवसांपासून अद्वय हिरे यांच्या प्रवेशाची चर्चा होती, मात्र आता तारीख वेळ आणि ठिकाण निश्चित झाले आहे. शिवसेना भवन येथे उद्या (27 जानेवारीला ) दुपारी चार वाजता प्रवेश होणार आहे.
उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश सोहळा होत असून यावेळी नाशिक जिल्ह्यातील बहुतांश हिरे समर्थक प्रवेश करणार असून त्याबाबतची जोरदार तयारी सुरू झाली आहे.