नाशिक : सुरुवातीपासून चुरस निर्माण झालेल्या नाशिक पदवीधर मतदार संघात दररोज नवनवीन घडामोडी घडत आहे. त्यातच आता स्वराज्य संघटनेचा पाठिंबा अपक्ष उमेदवार सुरेश पवार यांनी मिळवला आहे. त्यामुळे दुरंगी होणारी निवडणूक आता तिरंगी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कसमादे परिसरात दांडगा जनसंपर्क असलेले सुरेश पवार स्वराज्य संघटणेचा झेंडा घेऊन कॉंग्रेसचे निलंबित अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे आणि अपक्ष उमेदवारी आणि महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळवलेल्या शुभांगी पाटील यांना टक्कर देणार आहे. त्यामुळे सुरुवातीपासून चुरशीची ठरत असलेली नाशिक पदवीधर मतदार संघाची निवडणूक आणखी रंगतदार होत आहे. काही दिवसांपूर्वी कॉंग्रेस पाठिंबा मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करणाऱ्या सुरेश पाटलांना निराशा पदरी पडल्यानंतर त्यांनी स्वराज्याचा झेंडा हाती घेतला आहे. कॉंग्रेसची उमेदवारी मिळावी यासाठी सुरेश पवार स्वतः नाना पटोले यांच्या भेटीला गेले होते. तर दुसरींकडे शुभांगी पाटील यांना कॉंग्रेससह महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळाल्याने सुरेश पवार आता शिक्षक संघटना आणि स्वराज्य संघटनेच्या पाठिंब्यावर निवडणुकीत आपलं नशीब आजमावत आहेत.
राज्यातील पाचही विभागात अत्यंत चुरशीची आणि चर्चेत असलेली नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत आत्तापर्यंत दुरंगी होणारी निवडणूक आता तिरंगी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नाशिकच्या बागलाण येथील अपक्ष उमेदवार सुरेश पवार यांनी नुकताच स्वराज्य संघटनेत प्रवेश केला असून अधिकृत पाठिंबा मिळवला आहे. स्वराज्यप्रमुख छत्रपती संभाजीराजे यांच्या उपस्थित त्यांनी स्वराज्य संघटनेत प्रवेश केला आहे.
धुळे येथील शुभांगी पाटील आणि संगमणेर येथील सत्यजित तांबे यांच्यात खरी लढत होईल अशी स्थिती असतांना सुरेश पवार यांनी स्वराज्य संघटनेचा पाठिंबा घेऊन जोरदार प्रचाराला सुरूवात केली आहे.
नाशिक विभागात स्वराज्य संघटनेची मोठी ताकद आहे. गावागावात स्वराज्य संघटनेचे पदाधिकारी आहे, याचा फायदा सुरेश पवार यांना होण्याची शक्यता आहे, त्यामुळे नाशिकच्या निवडणुकीत आणखी चुरस बघायला मिळणार आहे.