नाशिक : सर्वसामान्य व्यक्तीला पालिकेच्या अजब कारभाराचा फटका बसलेलं आपण सर्वांनी अनेकदा पाहिलं आहे. पण थेट माजी नगरसेवकालाच पालिकेचा अजब कारभारचा अनुभव आल्याने नाशिकमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. कुठलीही मालमत्ता नसतांना लाखों रुपयांचे बिलाची नोटिस पालिकेकडून माजी नगरसेवकाला बजावण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा होऊ लागली आहे. पालिकेच्या या अजब कारभाराची संपूर्ण पालिका वर्तुळातही आज दिवसभर चर्चा होत आहे. नाशिकमधील उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक भागवत आरोटे यांना बजावलेली एक नोटीस सध्या वादग्रस्त ठरते आहे. नाशिक महापालिकेकडून सध्या करवसुलीची मोहीम हाती घेण्यात आली असून थकबाकीदारांना नोटीस बजावली जातीय. त्याच दरम्यान भागवत आरोटे यांना जबावण्यात आलेली नोटिस नाशिकमध्ये पालिकेचा कारभार कसा सुरू आहे हे सांगण्यासाठी पुरेशी आहे.
नाशिक शहरातील अंबड गाव चुंचाळे परिसरात माजी नगरसेवक भागवत आरोटे यांचा बंगला आहे. त्यांच्या या बंगल्यावर कुठल्याही प्रकारचे मोबाईल टॉवर नाही.
मात्र असं असतांना देखिल नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाने त्यांना तब्बल 13 लाख 25 हजार 808 रुपये रकमेची नोटिस बजावली आहे.
विशेष म्हणजे पैसे न भरल्यास थेट मिळकत जप्त करण्याचा यामध्ये इशारा देण्यात आला आहे त्यामुळे पालिकेच्या नोटिसीचे हसू होत आहे.
दरम्यान या संपूर्ण प्रकारामुळे माजी नगरसेवक भागवत आरोटे यांच्यासह त्यांच्या कुटुंबाला चांगलाच धक्का बसलाय आहे.
संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडे आरोटे यांनी विचारणा केली असता त्यांना याबाबत कुठलीही माहिती नसून आरोटे यांना समाधानकारक उत्तर मिळालेले नाही.
माजी नगरसेववक आरोटे यांनी याबाबत थेट पालिकेचे आयुक्त डॉ. चंद्रकांत पूलकुंडवार यांच्याकडे या प्रकरणाची चौकशी करून कारवाईची मागणी करणार आहे.
कुठल्याही सर्वसामान्य नागरिकासोबत नाही तर चक्क लोकप्रतिनिधीसोबतच अशी घटना घडल्याने नाशिकमध्ये हा चर्चेचा विषय ठरतोय.
विशेष म्हणजे ज्या विभागातून ही नोटिस काढण्यात आली आहे, त्या विभागातील अधिकारी यावर कुठलीही माहिती देत नाहीये, त्यामुळे हा प्रकार नेमका काय आहे हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.