मुंबई | 25 ऑक्टोंबर 2023 : मराठा आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. जरांगे पाटील यांनी नेते, मंत्री, आमदार यांना गावबंदी करा असे आवाहन केले होते. त्यांच्या या आवाहनाला प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. अनेक गावांनी नेते, मंत्री आमदार यांना गावबंदी केलीय. मराठा आरक्षणाचे हे लोन राज्यात पसरले आहे. जालन्यातील अंबडचे रहिवाशी असलेल्या सुनील कावळे यांनी सहा दिवसांपूर्वी आपले जीवन संपवले. त्यांनी ‘आधी मराठा आरक्षण मग इलेक्शन’ अशी चिट्ठी लिहून ठेवली होती. त्यामुळे मराठा समाज अधिक संतापला आहे. अनेकांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. पण, याचा मोठा फटका राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणुकीला बसलाय.
राज्यातील 2359 ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला. ग्रामपंचायत सदस्य पदासाठी ही निवडणूक होत आहे. तर, सरपंचपदासाठी थेट निवडणूक होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा अखेरचा दिवस होता. दुपारी तीन वाजेपर्यंत अजे मागे घेण्याची मुदत होती. मात्र, मराठा समाजाच्या आंदोलनामुळे निवडणुकीत अर्ज दाखल करूनही अखेरच्या दिवशी उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी पंढरपुरमधील चाळीस दिवसांपासून साखळी उपोषण सुरु आहे. मात्र, मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरु होताच वेगवेगळ्या पक्षातील पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले. राष्ट्रवादी, मनसे, शिवसेना, काँग्रेस या पक्षाचे शहराध्यक्ष, तालुकाध्यक्ष यांनी राजीनामे देत मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संदीप मांडवे, मनसेचे तालुकाध्यक्ष संतोष कवडे, शिवसेना शिंदे गट शराध्यक्ष सुमित शिंदे, भाजपाचे सचिव नितिन करांडे, कॉंग्रेस शहराध्यक्ष हणुमंत मोरे यांनी आपापल्या पदाचे राजीनामे दिलेत.
मराठा आरक्षणाचा निर्णय जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत गावात निवडणुका घेऊ नका अशी मागणी धाराशिव तालुक्यातील जागजी गावातील गावकऱ्यांनी केली. त्यांच्या या मागणीला प्रतिसाद देत भाजप आणि ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी निवडणुकीसाठी भरलेले आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. पंचायतमधील सहा ग्रामपंचायत पोटनिवडणुकीवर ग्रामस्थांनी एकत्रित येत बहिष्कार टाकला.
परभणीच्या पूर्णा तालुक्यातील वझुर येथील ग्रामपंचायतीसाठी निवडणूक जाहीर झाली. एक सरपंच आणि 11 ग्राम पंचायत सदस्य अशा 12 जागांसाठी ही निवडणूक होणार होती. या निवडणुकीत सरपंच पदासाठी 3 तर ग्रामपंचायत सदस्यासाठी 31 अर्ज असे एकूण 34 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. मात्र, मराठा आरक्षणाचा मुद्दा समोर करत येथील सर्वच्या सर्व म्हणजे 34 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. पालम तालुक्यातील चाटोरी ग्रामपंचायतमधील एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार होती. तिथेही चार चार जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र, या चारही जणांनी आपले उमेदवारी अर्ज परत घेत मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला पाठींबा दिला.