अहमदनगर | 16 नोव्हेंबर 2023 : सोलापूर येथे शेतकरी मेळाव्यात बोलताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या या टीकेला भाजपच्या मंत्र्याने जळजळीत उत्तर दिलंय. शरद पवार यांनी सोलापूरमध्ये सत्ताधारी तसेच अजित दादा यांच्यासोबत गेलेल्या राष्ट्रवादीच्या आमदारांवरही जोरदार निशाणा साधला. ‘जवाहरलाल नेहरू यांच्यापासून ते इंदिरा गांधी यांच्यापर्यंत सर्व पंतप्रधान यांची भाषणे मी ऐकली. पण, नरेंद्र मोदी ज्याप्रमाणे स्थानिक मुख्यमंत्र्यांवर टीका करतात हे चुकीचं आहे. याआधी कोणत्याही पंतप्रधानांनी अशी टीका केली नाही.’, असे पवार म्हणाले. मी जातीचे राजकारण करत नाही. माझी जात लोकांना माहीत आहे असा टोलाही त्यांनी लगावला होता.
शरद पवार यांच्या याच विधानावरून पवार यांचे कट्टर राजकीय वैरी आणि भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जळजळीत टीका केली आहे. शरद पवार यांनी कितीही इशारा दिला तरी त्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी लक्ष देणार नाहीत. कारण, स्वतः शरद पवारांच्या जातीचा प्रश्न आता तयार झाला आहे. सध्या त्याच्यावर जोरदार चर्चा सुरू आहे असा टोला त्यांनी लगावला.
शरद पवार म्हणतात की मी जातीचे राजकारण करत नाही. माझी जात लोकांना माहीत आहे. परंतु, शरद पवार यांनी “गर्व से हम मराठा है” हे पवारांनी एकदा जाहीरपणे सांगावे. शरद पवार यांनी देखील ‘एक मराठा लाख मराठा’ घोषणा द्यावी. अशी टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र गरुडझेप घेईल असे सांगून ते पुढे म्हणाले, आज ते जरी उपमुख्यमंत्री असले तरी राज्याच्या बहुतांशी विकासाची धुरा त्यांच्यावरच आहे. त्यांचे निर्णय घ्यायला ते सक्षम आहेत. तसेच, पक्ष नेतृत्वाला त्यांच्या कार्यक्षमतेची कल्पना आहे.
सध्या विरोधकांकडे कुठलाही कार्यक्रम शिल्लक राहिलेला नाही. विरोधकांची इंडियाची बांधणी सुरू असली तरी काहींचा ‘I’ तर काहींचा ‘D’ गेलाय अशी टीकाही त्यांनी केली. नरेंद्र मोदी यांनी तिसरी सर्वोच्च अर्थव्यवस्था म्हणुन देशाला उभारी दिली. त्यामुळे देशातील नागरिकांचे राहणीमान उंचावले. मजूर असो वा सामान्य नागरिक, सर्वांच्या जीवनात स्थैर्य आले असेही त्यांनी सांगितले.