मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्याची एकच चर्चा सुरु असताना दुसरीकडे राज्यातील बळीराजा मात्र हवालदिल झाला आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांना अवकाळी पाऊस, गारपिटीने झोडपले आहे. यात शेतकऱ्यांच्या कांदा, मका, ज्वारी, गहू यासह फळ पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री यांच्यासह मंत्री, आमदार अयोध्या दौऱ्यावर असल्यामुळे शासकीय यंत्रणा सुस्तावली असल्याचे चित्र दिसत आहे. अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याने बळीराजाच्या हातात तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. त्यामुळे या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
राज्यातील बीड, धाराशिव, बुलढाणा, नागपूर, जालना, यवतमाळ, संभाजीनगर, सोलापूर, जळगाव, नांदेड या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून या शेतकऱ्यांनी तत्काळ नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शासनाकडे केली आहे.
बीड : जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. बीड, गेवराई, माजलगाव, परळी आणि अंबाजोगाई सह इतर तालुक्यात पावसाची संततधार सुरू आहे. बोरगावमध्ये गारांचा पाऊस पडला. अचानक झालेल्या पावसामुळे भाजीपाला, फळबागांचे नुकसान झाले.
केज तालुक्यातील अनेक गावांत गारांच्या पावसाने हाहाकार उडाला. गेल्या आठवड्यातच गारांचा पाऊस होऊन पिकांचे मोठे नुकसान झाले होते. आज पुन्हा गारांचा पाऊस पडल्याने उरले सुरले पीकही धोक्यात आले आहे.
बुलढाणा : जिल्ह्यात विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. खरिपातील पीक हातातून गेल्यानंतर शेतकऱ्यांना रब्बी पिकाची मोठी आशा होती. गेल्या महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने गहू, हरभरा हे पीक हातून निघून गेले. तर आता झालेल्या पाऊस आणि गारपिटीमुळे कांदा, मका, ज्वारी, गहू यासह फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
जिल्ह्यातील लोखंडा गावात वादळी वाऱ्यामुळे अनेक नागरिकांच्या घराची छपरे उडून गेली आहेत. तर, काही नागरिकांच्या घरांच्या भिंती पडल्या. त्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले. प्रशासनाने तत्काळ पंचनामे करून मदत देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
नागपूर : विदर्भाच्या अनेक जिल्ह्यात काल दुपारपासून सुरू झालेला पाऊस अजूनही सुरूच आहे. एकीकडे उन्हाचा तडाखा आणि पाऊस अशा वातावरणामुळे नागरिकांचे आरोग्य बिघडले आहे. विदर्भातील धान्य पिकावर या पावसाचा परिणाम होणार असून शेत पिके धोक्यात आली आहेत.
जालना : अंबड तालुक्यातील वडीगोद्री परिसरात अवकाळी पाऊस झाल्यामुळे काढणीस आलेल्या गहू पिकाचे नुकसान झाले आहे. आंबा, मोसंबी, डाळिंब आदी फळबागांना अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे.
यवतमाळ : जिल्ह्यातील नेर, बाभूळगाव, महागाव, आर्णी तालुक्यात अवकाळी पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. नेरमध्ये गारा आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्यामुळे आंबा आणि भाजीपाला पिकाचे नुकसान झाले.
छत्रपती संभाजीनगर : सिल्लोड, कन्नड आणि सोयगाव तालुक्याला वादळी पावसाने झोडपले आहे. सोयगाव तालुक्यातील जंगल तांडा गावाला वादळाचा जोरदार तडाखा बसला. गावातील विजेचे लोखंडी पोल हे पूर्ण वाकून गेले असून काही घरावरील आणि शेतातील शेडवरील पत्रे उडून गेले.
बुलढाणा : जिल्ह्यात पंढरपूर शहर आणि तालुक्यात मोठा पाऊस झाला असून अनेक फळपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. सलग आलेल्या सुट्ट्यामुळे श्री विठ्ठल दर्शनाकरता अनेक भाविक पंढरपूर मध्ये दाखल झाले आहेत. पण, अचानक आलेल्या पावसामुळे मंदिर परिसरात त्यांचीही तारांबळ उडाली.
जळगाव : जामनेर तालुक्यातील तोंडापूर ढालगाव, ढालसिंगी, मांडवा परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. मका, केळी, कांदा, कापूस पिकाचे नुकसान झाले असून बळीराजाच्या हातात तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.
नांदेड : जिल्ह्यात पहाटेपासूनच अवकाळी पावसाने हजेरी लावली. देगलूर – बिलोली, नायगांव तालुक्यात रात्री उशिरा पाऊस पडला. विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यामुळे अनेक भागातील विद्युत पुरवठा खंडित झाला. ज्वारी आणि हळदीच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.