मुंबई : राज्यात सध्या विधान परिषदेच्या पाच जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. त्यावरून काही मतदार संघात गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. त्यातच नाशिकमधील महाविकास आघाडीचा उमेदवार कोण याबाबत देखील चर्चा सुरू होती. यासर्व चर्चेचा खुलासा करण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतिने कॉंग्रेसकडून नाना पटोले, राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून डॉ. जितेंद्र आव्हाड आणि शिवसेना ठाकरे गटाकडून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे उपस्थित होते. यावेळी नागपूर, औरंगाबाद, अमरावती, नाशिक आणि कोकण विभागातील महाविकास आघाडीचे उमेदवार कोण आहेत हे जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये नागपूरमधून सुधाकर अडबाले, अमरावतीमधून धीरज लिंगाडे, औरंगाबादमधून विक्रम काळे, नाशिकमधून शुभांगी पाटील आणि कोकणातून बाळाराम पाटील हे अधिकृत उमेदवार असल्याचे महाविकास आघाडीने जाहीर केले आहे.
यावेळी कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी सत्यजित तांबे यांच्याबाबत भाजपनेही भूमिका जाहीर करावी असे आवाहन करत सत्यजित तांबे यांनाही कॉंग्रेसमधून निलंबित करण्यात आल्याचे म्हंटले आहे.
शुभांगी पाटील या महाविकास आघाडीच्या उमेदवार असून त्यांच्या प्रचारासाठी बाळासाहेब थोरात नक्की येणार असून ते रुग्णालयात आहे लवकरच ते बाहेर येतील असेही नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे.
याशिवाय पाचही निवडणुका आम्ही जिंकू, त्याप्रकारचे वातावरण राज्यात आहे. जुनी पेन्शनचा हिशोब कुठेही चालू नाही, कॉंग्रेसच्या सगळ्या राज्यात जुनी पेन्शन लागू आहे.
बेरोजगारी आणि नोकरीत काम करणारे लोकं नाराज आहे, नाशिकमध्ये भाजपला साधा उमेदवार मिळाला नाही, स्वतःला मोठा पक्ष म्हणवून घेतो असे म्हणणाऱ्या पक्षाची अशी अवस्था झाल्याचा टोला पटोले यांनी लगावला आहे.
सत्यजित तांबे यांनी यापूर्वीच देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे यांचे नाव घेतले होते, महाविकास आघाडीने भूमिका जाहीर केली आहे खाजगी भूमिका कुणाची नाही असेही गोंधळाची स्थिती असलेल्या जागेबद्दल स्पष्ट केले आहे.
गोंधळ कुणी घडविला आणि कॉंग्रेस पक्षाची कोणी बदनामी केली, शुभांगी पाटील यांच्या प्रचाराला बाळासाहेब थोरात राहणार आहे, नाशिकमध्ये भाजपची काय ती स्पष्टता समोर येणार आहे, भाजप घर फोडण्याचे काम करत आहे ही स्पष्ट होत आहे असा आरोप पटोले यांनी केला आहे.