मराठा आंदोलनाचा राज्यभरात वणवा, पहा राज्यात कुठे काय, काय घडलं?

| Updated on: Sep 02, 2023 | 6:02 PM

मराठा समाजाच्या भाजप पदाधिकाऱ्यांनी राजीनामा द्यायला सुरुवात केली आहे. पाच सप्टेंबरला सांगलीमध्ये बैठक होणार असून त्यावेळी पुढील दिशा निश्चित करण्यात येणार आहे. लाठी हल्ल्यामुळे पुढील काळात सरकारने या हल्ल्याच्या प्रतिउत्तराला तयार राहावे असा इशारा देण्यात आला.

मराठा आंदोलनाचा राज्यभरात वणवा, पहा राज्यात कुठे काय, काय घडलं?
MARATHA SAMAJ ANDOLAN
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us on

मुंबई : 2 सप्टेंबर 2023 | जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या गावात पोलिसांनी मराठा समाजाच्या आंदोलकांवर लाठीमार केला. या लाठीमारात अनेक आंदोलक जखमी झाले. पोलिसांनी 350 आंदोलकांवर गंभीर गुन्हे दाखल केले. या घटनेमुळे मराठा समाज पुन्हा आक्रमक झाला आहे. राज्यात अनेक ठिकाणी आंदोलने सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात मराठा समाजाची 10 तारखेपूर्वी राज्यव्यापी बैठक होणार आहे. पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी ही बैठक होणार असल्याची माहिती मराठा समन्वयक दिलीप देसाई यांनी दिली.

मराठा सेवा संघाचे पुरुषोत्तम खेडेकर यांनी या घटनेचा निषेध करत पोलिसांनी जो लाठीचार्ज केला त्याला राज्यशासन जबाबदार असल्याची टीका केली. गृहमंत्र्यांच्या आदेश शिवाय हे शक्य नाही. त्यामुळे राज्यसरकारने जबाबदारी घेऊन चालते व्हावे, अशी मागणी त्यांनी केली. मराठा समाजात भांडण लावणे, केसेस दाखल करणे असे षडयंत्र सरकारने रचलेले आहे असा आरोप त्यांनी केला. तसेच संवैधनिक पद्धतीने आंदोलन सुरू ठेवण्याचे आवाहनही त्यांनी केले.

हे सुद्धा वाचा

भाजप पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

सांगली जिल्ह्यात मराठा समाजाच्या भाजप पदाधिकाऱ्यांनी राजीनामा द्यायला सुरुवात केली आहे. पाच सप्टेंबरला सांगलीमध्ये बैठक होणार असून त्यावेळी पुढील दिशा निश्चित करण्यात येणार आहे. जालना येथील घटनेच्या निषेधार्थ मराठा समाजकडून भाजपाच्या सर्व पदांचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. विलास देसाई या तरुणाने भाजपाच्या प्राथमिक सदस्यत्वचा राजीनामा देण्याची घोषणा आंदोलनादरम्यान केली. तसेच राज्यभरातील सर्व मराठा समाजातील पदाधिकाऱ्यांनी भाजपच्या पदाचा राजीनामा द्यावा असे आवाहनही केले.

येणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार

सांगली : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्फुर्तीस्थळा समोर निदर्शने करण्यात आली. यावेळी आंदोलकांनी राज्य सरकारचा निषेध केला. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या प्रतिकात्मक पोस्टरला जोडे मारून आंदोलन केले. राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी करून येणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय मराठा बांधवांनी घेतला.

सरकारने हल्ल्याच्या प्रतिउत्तराला तयार राहावे

अहमदनगर : जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. येथे रास्ता रोको करून लाठी हल्ल्याचा आणि सरकारचा निषेध करण्यात आला. आधी मूक मोर्चाद्वारे सरकारला घाम फोडला. आता लाठी हल्ला झाल्यामुळे पुढील काळात सरकारने या हल्ल्याच्या प्रतिउत्तराला तयार राहावे असा इशारा देण्यात आला.

कुठे कुठे आंदोलक आक्रमक ?

सातारा : मराठा आंदोलकांवरील लाठीचार्जचे पडसाद साताऱ्यात उमटले. मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षक समीर शेख यांची भेट घेतली. लाठीचार्ज केलेल्या पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. बाहेरील अज्ञात व्यक्तींनी आंदोलना दरम्यान दगडफेक केली असल्याचा संशय यावेळी व्यक्त करण्यात आला. पोवई नाक्यावरील शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घालून तीव्र घोषणाबाजी करण्यात आली.

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील अनेक बस स्थानकांवर बसेस न सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शहरातील तारकपूर, माळीवाडा बस स्थानक तसेच पुणे बसस्थानकावरून बसेस बंद करण्याचे आवाहन करण्यात आले. मात्र, बाहेरून आलेल्या बसेसमधून जे प्रवासी पुढे जाणार आहेत त्याचे हाल होत आहेत. अनेक प्रवासी बस स्थानकावर खोळंबून आहेत.

परळी : मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मोटरसायकल रॅली कडून नागरिकांना बंदचे आवाहन केले. संपूर्ण व्यापार पेठे सामसुम होती. शांततेच्या मार्गाने हे आंदोलन सुरू आहे.

सोलापूर : सोलापूर अक्कलकोट महामार्गावर आंदोलकांनी टायर जाळून सरकारचा निषेध केला. यामुळे अक्कलकोटला आलेले भाविक खोळंबले. सोलापूरच्या माढ्यातही आंदोलन करण्यात आलं. यावेळी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जिल्हा पोलिस अधिक्षक यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली. यावेळी आंदोलकांनी ‘एक मराठा, लाख मराठा’ च्या घोषणा दिल्या.

परभणी : मराठा समाजाने जिल्हा बंदची हाक दिल्यानंतर येथे कडकडीत बंद पाळला जात आहे. शहरासह पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, मानवत आदी ठिकाणी बंद आहे, मराठा समाजाने जिल्हाधिकाऱ्यांना भेटून निवेदन दिले. यात पोलीस अहिकारी यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.

धाराशिव : जिल्ह्यात तणावपूर्ण शांतता आहे. धाराशिव बंदला 100 टक्के प्रतिसाद मिळाला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी एकही बस डेपो बाहेर आणण्यात आली नाही. त्यामुळे प्रवाशी वाहतुकीचा खोळबा उडाला.

लातूर : लातूरची शहर पूर्ण बंद असून एसटी सेवाही बंद ठेवण्यात आली आहे. सकाळीच मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यानी बाजारपेठ बंद करण्याचे आवाहन केले. व्यापाऱ्यांनी बाजारपेठ बंद ठेवत या आवाहनाला प्रतिसाद दिला. छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र येत या कार्यकर्त्यानी लाठीचार्ज घटनेचा निषेध केला.

यवतमाळ : यवतमाळमध्ये मराठा कुणबी क्रांती मोर्चाच्या वतीने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा पुतळा जाळून निषेध आंदोलन केले. बस स्थानक चौकात हे आंदोलन केले. यावेळी पोलीस आणि आंदोलक यांच्यात झटापट झाली.

नाशिक : लासलगाव येथील बाजार समितीच्या मुख्यालयासमोरील आवारात मराठा क्रांती मोर्च्याच्या कार्यकर्त्यांनी बैठक घेतली. येवला, लासलगाव विधानसभा मतदारसंघातील गावे बंद ठेवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. राज्य सरकारच्या विरोधात तीव्र रोष व्यक्त करण्यात आला. या बैठकीला आमदार नरेंद्र दराडे, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर उपस्थित होते.

नाशिक नांदगाव : राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी येत्या गुरुवारी 7 तारखेला रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी लाठीचार्ज करण्याचे आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यांचे निलंबन करा अशी मागणी करण्यात आली. मराठा समाजाच्या भविष्यासाठी संघटित व्हा, मराठा समाजाला आरक्षण मिळावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.

अमरावती : सकल मराठा समाजाने मुंबई नागपूर हायवेवर आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी नवीन बायपास मार्गावर टायर जाळले. जालना येथील लाठीमाराचा निषेध करत मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

नालासोपारा : नालासोपारा पूर्व तुलिंज परिसरात मराठा समाजाने मोर्चा काढून लाठीचार्ज करणारे पोलीस आणि त्यांना आदेश देणारे शिंदे-फडणवीस-पवार सरकारचा निषेध केला. मराठा समाजाने आतापर्यंत शांत पद्धतीने मोर्चे काढले. पण, सरकार जर हुकूमशाहीने वागत असेल तर मराठा पेटल्याशिवाय राहणार नाही असा इशारा आंदोलनकर्त्यांनी सरकारला दिला.