औरंगाबाद : केंद्र सरकारच्या (Central Government) मंजुरीनंतर राज्यातील औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराचे नाव (Change of City Name) बदलण्यात आले आहे. आता औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्यात आले आहे. औरंगाबादचे नाव मुगल बादशाह औरंगजेब, तर उस्मानाबादचे नाव हैदराबाद संस्थानचा 20 व्या शतकातील शासकाच्या नावावरुन ठेवले होते. अर्थात आता सरकारी कार्यालये, महत्वाची ठिकाणी येथील पाट्या बदलण्यास सुरुवात झाली आहे. एसटी महामंडळाच्या छत्रपती संभाजीनगरकडे येणाऱ्या सर्वच बसेवरील नामफलक, रेल्वे स्थानकाचे नावे बदलण्यात येत आहे. शैक्षणिक, सामाजिक संस्थांनीही त्यांच्या शहराच्या नावात बदल केला आहे. पण या नामांतराचा सर्वसामान्य नागरिकांवरही (Common Man) मोठा परिणाम होणार आहे. आता सर्वच शासकीय कागदपत्रांवरील, ओळखपत्रांवरील शहराच्या नावात बदल करणे क्रमप्राप्त आहे.
तर या दोन्ही जिल्ह्यातील रहिवाशांना त्यांच्या सर्व प्रकारच्या नावात आता या बदल केलेल्या नावाचा समावेश करावा लागेल. जमिनीचे कागदपत्रे, तहसील, जिल्हा प्रशासनाची कागदपत्रे, शैक्षणिक संस्थांमधील कागदपत्रे, नागरिकांची ओळखपत्रे, संपूर्ण जिल्ह्यातील कार्यालयीन कागदपत्रे, नागरिकांची ओळखपत्रे, विविध महत्वाचे दस्तावेज यांच्या नावात आता बदल करावा लागेल.
सर्वसामान्य नागरिकांना आधारकार्डचा पत्ता बदलण्यासाठी आता आधार केंद्रावर जाऊन अर्ज भरुन द्यावा लागेल. त्यावर या बदललेल्या नावाचा समावेश करावा लागेल. बायोमॅट्रीक पद्धतीने हा पत्ता अपडेट करावा लागेल. अर्थात त्यासाठी 50 ते 100 रुपयांचा खर्च येईल. सध्या पासबूकवरील जुन्या शहराचे नाव कायम असेल. पण पुढे हे नाव बँकांना बदलावे लागेल. बँकेतील व्यवहार खाते क्रमांक आणि आयएफसी कोडच्या माध्यमातून होते. त्यामुळे सध्या ग्राहकांना याठिकाणी नामांतराचा परिणाम जाणवणार नाही.
एका अहवालानुसार, शहराचे नाव बदलण्याचा खर्च कोट्यधी रुपयांमध्ये जातो. देशात सर्वाधिक शहरांची, जिल्ह्यांची नावे उत्तर प्रदेशमध्ये बदलण्यात आल्याचा आपला समज आहे. पण देशात आंध्रप्रदेशमध्ये आतापर्यंत सर्वात जास्त, 76 शहरांची आणि जागांची नावे बदलण्यात आली आहे. त्यानंतर तामिळनाडूमध्ये 31, केरळमध्ये 26 शहरांची तर महाराष्ट्रात आतापर्यंत 20 शहरांची नावे बदलण्यात आली आहे. स्वातंत्र्यानंतर 9 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशांची नावे ही बदलण्यात आली आहे.
अशी आहे प्रक्रिया
केंद्र सरकारची मंजुरीची प्रक्रिया पूर्ण झाली की, आधी सामान्य प्रशासन विभाग अधिसूचना काढते, तेव्हा शहरांची नावे बदलतात. त्यानंतर महसूल व वन विभाग तसेच नगरविकास विभाग अधिसूचना काढते. तेव्हा संपूर्ण जिल्ह्याचे, तालुक्याचे, महापालिका आणि नगरपालिकेचे नाव बदलते.