अकोले /अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यासाठी वरदान ठरणारा निळवंडे धरण प्रकल्पासाठी जमिन देणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मात्र अडचणीचा ठरला आहे. अकोले तालुक्यातील धरणग्रस्तांनी आज तहसिल कार्यालयावर भव्य मोर्चा काढत आपल्या मागण्यांसाठी उपोषण सुरू केल आहे. अहमदनगर जिल्ह्यातील उत्तर भागाला वरदान ठरणारा निळवंडे धरण प्रकल्प पन्नास वर्षापूर्वी मंजूर झाला आहे. अतिशय संथ गतीने काम सुरू असलेल्या निळवंडे धरणातून आपल्या शेतीला पाणी मिळणार या आशेवर दोन पिढ्यांनी त्यासाठी संघर्ष केला. आता मात्र धरणाच्या कालव्यांचे जवळपास 90 टक्के काम झाले असून लवकरच शेतात पाणी खळाळणार आहे.
या लाभक्षेत्रातील जनता एकीकडे आनंदी आहे तर दुसरीकडे मात्र ज्यांनी धरणासाठी आपल्या जमिनी दिल्या आहेत त्यांना आजही आपल्या न्याय हक्कासाठी लढावं लागतं आहे.
निळवंडे धरणाच्या कालव्यांची कामे आता अंतिम टप्प्यात आहे, मात्र ही कामं करत असताना शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाण्यासाठी शेतीमार्गच राहिले नाहीत.
त्यामुळे अरूंद रस्त्यावरून प्रवास करताना आत्तापर्यंत तीन जणांना आपला जीवही गमवावा लागला आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांनी आता शासन आमच्यावर अन्याय का करते आहे असा सवाल आता उपस्थित केला आहे. शासनाने दुर्लक्ष केल्यामुळेच आता धरणग्रस्तांनी आता आंदोलन पुकारले आहे.
अकोले तालुक्यातील म्हाळादेवी येथील महिला पुरूषांनी अकोले तहसील कार्यालयावर आज मोर्चा काढून लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे.
विविध मागण्यांसाठी आता शेकडो महिला पुरूष तहसिल कार्यालयासमोर आंदोलन करत आहेत. शासनाने धरणग्रस्तांवर अन्याय केला असून जर मागण्या मान्य झाल्या नाही तर पंतप्रधान काय राष्ट्रपती जरी उद्घाटनाला आले तर कार्यक्रम उधळून लावू असा इशाराच आता आंदोलकांनी दिला आहे.
ज्यांनी दुष्काळग्रस्त भागासाठी वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणासाठी आणि कालव्यांसाठी आपल्या जमिनी दिल्या त्यांच्यावर होणारा अन्याय सरकार कधी दूर करणार असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.