पक्ष गेला, चिन्ह गेले यामुळे ‘ते’ ठाकरे चर्चेत आणि आता गुगल मॅपमुळे ‘हे’ ‘ठाकरे’ चर्चेत

| Updated on: Feb 25, 2023 | 5:15 PM

उद्धव ठाकरे यांनी तर थेट आपला बाप चोरल्याचा आरोप एकनाथ शिंदे यांच्यावर केला. यामुळे वातावरण तापले असतानाच आता चक्क 'ठाकरे' नावच गायब करण्यात आले आहे.

पक्ष गेला, चिन्ह गेले यामुळे ते ठाकरे चर्चेत आणि आता गुगल मॅपमुळे हे ठाकरे चर्चेत
UDDHAV AND RAJ THACKAREY
Image Credit source: TV9 NETWORK
Follow us on

पुणे : राज्यात पक्ष आणि पक्षाचे चिन्ह यावरून मोठे राजकारण पेटले आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडील पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांच्याकडे गेल्यामुळे शिंदे गटाची ताकद वाढली आहे. यावरून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत आहेत. उद्धव ठाकरे यांनी तर थेट आपला बाप चोरल्याचा आरोप एकनाथ शिंदे यांच्यावर केला. यामुळे वातावरण तापले असतानाच आता चक्क ‘ठाकरे’ नावच गायब करण्यात आले आहे. हा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. या घटनेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी थेट महापालिका आयुक्‍तांनाच जाब विचारला आहे.

उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून राज्यात सत्ता स्थापन केली. आता शिंदे यांनी स्वतंत्र गट स्थापन करून भाजपसोबत जात राज्यातील सत्ता हस्तगत केली. त्यामुळे सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे टार्गेट उद्धव ठाकरे हेच आहेत. पुणे महापालिकेत भाजपची सत्ता असल्यामुळे महापालिकेला “ठाकरे’ नावाचे वावडे आहे का ? असा प्रश्‍न उपस्थित करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

प्रकार असा आहे की, कोथरूड ते आशिष गार्डन या रस्त्याला ‘संगीतकार श्रीकांत ठाकरे पथ’ असे नाव देण्याचा प्रस्ताव समितीसोर आला. समितीने हा प्रस्ताव मान्य केला. त्यांनतर पुणे महापालिकेने या रस्त्याचे नामकरण ‘संगीतकार श्रीकांत ठाकरे पथ’ असे केले. महात्मा सोसायटीकडे जाणारा हा रस्ता त्यानंतर गुगल मॅपवर दिसत होता. मात्र, अचानक काही दिवसांपासून गुगल मॅपवरून गायब झाला आहे.

‘संगीतकार श्रीकांत ठाकरे पथ’ या नावाऐजी आता गोखले मार्ग असा उल्लेख गुगल मॅपवर दिसत आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी याचा निषेध नोंदवला आहे. याबाबत कोथरूड बावधनचे क्षेत्रीय अधिकारी यांनी महापालिकेने रस्त्याचे नाव बदलले नाही. गुगल मॅपची ही चुकी असेल. पण, याबाबतची चौकशी करून संबंधित विभागाच्या निदर्शनास आणून देण्यात येईल, असे आश्वासन दिले.

माजी नगरसेवक राजू गोरडे यांनी संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करणारे निवेदन पुणे महापालिका आयुक्‍त आणि पोलीस आयुक्तांना दिले आहे. सर्वांना अंधारात ठेवून परस्पर नाव बदलण्यात आणण्याची ही कृती चुकीची आहे. ‘ठाकरे’ आडनाव असलेल्या रस्त्याचे इतके वावडे आहे का ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.