पुणे : असं म्हणतात, पुणे तिथे काय उणे, जे-जे नवं ते पुण्याला हवं..या सर्व म्हणीला साजेल असाच देखावा यंदा पुण्यातील (Ganesh Mandal) नरेंद्र गणेश मंडळासमोर पाहवयास मिळणार आहे. (Social and political) सामाजिक आणि राजकीय परस्थितीला अनुसरुन (Scenes) देखावे हे या मंडळाचे वैशिष्ट्ये राहिलेले आहे. आता तुम्हाला वाटले आणखी गणरायांचे आगमनही झाले नाही आणि आम्ही सांगतोय ते थेट देखाव्याबद्दल..आहो त्याला कारणही तसेच आहे. मंडळाचे नाव नरेंद्र असले तरी यंदा या मंडळाने राज्यातील सत्तानाट्य गणरायासमोर उभा करण्याचे ठरवले आहे. एवढेच नाहीतर देखावा तयार करायला सुरवातही झाली आहे. ‘सत्ताधाऱ्यांचे समुद्रमंथन अन् कार्यकर्त्यांचे मरण’ शिंदे-ठाकरेंच्या सत्तासंघर्षाचे देखाव्यातून दर्शन होणार आहे. हा देखावा मनोरंजक असला तरी कार्यकर्त्यांना आत्मपरिक्षण करायला लावणारा असणार आहे.
राज्यात गणेश उत्सावाला सुरवात झाली त्या पुण्यात दरवर्षी सामाजिक, राजकीय आणि मनोरंजन होईल असे देखावे केले जातात. कल्पक आणि ज्वलंत विषयांवरील आकर्षक देखाव्यामुळे पुण्यातील गणेशोत्सव हा सातासमुद्रा पार पोहोचला आहे. लोकमान्य टिळकांनी ज्या उद्देशाने हा उत्सव सुरू केला होता, त्याचे प्रतिबिंब पुण्यातल्या सार्वजनिक मंडळाच्या देखाव्यांमध्ये पाहायला मिळते. गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रामध्ये जो सत्ता संघर्ष सुरू आहे, त्या सत्तासंघर्षावर आधारित सत्तामंथन हा देखावा पुण्यातील नरेंद्र मित्र मंडळांने सादर करण्याचे ठरवले आहे.
पुण्यातल्या नरेंद्र मित्र मंडळाच्या वतीने यंदा महाराष्ट्रातल्या चालू घडामोडींवर आधारित ‘सत्ताधाऱ्यांचे समुद्रमंथन आणि कार्यकर्त्यांचे मरण’ हा देखावा सादर करण्याचे ठरवले आहे. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे समोरासमोर दाखवण्यात आले आहेत. हे दोघे सत्तेचे समुद्रमंथन करीत आहेत. तर यामध्ये सामान्य कार्यकर्त्यांचे कसे मरण होतेय ते दाखवण्यात आले आहे. राजकारण कोणत्याही स्तराला गेले तरी काही निवडक लोकांनाच याचा फायदा होतो तर इतर कार्यकर्त्यांचे मात्र यामध्ये मरण होते हाच संदेश यामधून दिला जाणार असल्याचे मंडळाच्यावतीने सांगण्यात आले आहे.
गेल्या अडीच महिन्यापासून राज्याच्या राजकारणात कसे बदल झाले आहेत? राजकीय समिकरणे कशी बदलली गेली आहेत याचे दर्शन आता देखाव्यातून केले जाणार आहे. यामुळे सर्वसामान्य जनतेची करमणूक होणार असली तरी कार्यकर्त्यांना मात्र, विचार करायला लावणारा हा ‘सत्ताधाऱ्यांचे समुद्रमंथन अन् कार्यकर्त्यांचे मरण’ देखावा असणार आहे. त्यामुळे नरेंद्र मंडळाचे वेगळेपण यंदाही कायम राहणार आहे.