आता शिर्डीला पोहचायला किती वेळ लागणार पाहा, प्रस्तावित मुंबई – नागपूर बुलेट मार्गाने स्वप्न साकार होणार

| Updated on: Sep 11, 2023 | 12:53 PM

प्रस्तावित मुंबई ते नागपूर बुलेट ट्रेनच्या मार्गावरील शिर्डी स्थानकामुळे मुंबई ते शिर्डी हे अंतर कापायला खूपच कमी वेळ लागणार आहे.

आता शिर्डीला पोहचायला किती वेळ लागणार पाहा, प्रस्तावित मुंबई - नागपूर बुलेट मार्गाने स्वप्न साकार होणार
bullet-train
Image Credit source: socialmedia
Follow us on

मुंबई | 11 सप्टेंबर 2023 : मुंबईकरांना शिर्डीच्या साई दर्शनाला आता लवकरच अवघ्या एका तासांत पोहचणे शक्य होणार आहे. सध्या शिर्डीला पोहचण्यासाठी सहा तासांचा वेळ लागतो. परंतू प्रस्तावित मुंबई – नागपूर सुपरफास्ट बुलेट ट्रेनने हाच प्रवास 1 तास 10 मिनिटांत करता येणार आहे. मुंबई ते नागपूर बुलेट ट्रेनचा डीटेल प्रोजेक्ट रिपोर्ट ( डीपीआर ) महाराष्ट्र सरकार आणि रेल्वे मंत्रालयाला गेल्यावर्षी सादर करण्यात आला होता. या बुलेट ट्रेन प्रकल्पाने मुंबई ते नागपूर हे अवघ्या 3 तास 30 मिनिटांत कापता येणार आहे. सध्या मुंबई ते नागपूर या प्रवासाला 11 ते 12 तासांचा वेळ लागत आहे.

डीटेल प्रोजेक्ट रिपोर्टनूसार मुंबई ते नागपूर बुलेट ट्रेनच्या मार्गाची सुरुवात वांद्रे – कुर्ला कॉम्पेक्स ( बीकेसी ) येथूनच होणार असून सध्या मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या मार्गाने व्हाया ठाणे हा मार्ग पुढे शहापूर, घोटी, इगतपूरी, नाशिक, शिर्डी नंतर मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गाच्याकडेने नागपूरला जाणार आहे. 741 किलोमीटर लांबीच्या मुंबई ते नागपूर बुलेट ट्रेनच्या मार्गाला 1.7 लाख कोटी रुपये अपेक्षित आहे. या मार्गावरुन दर ताशी 350 किमी वेगाने बुलेट ट्रेन चालविणे शक्य होणार असल्याने प्रवाशांच्या वेळत प्रचंड बचत होणार आहे. डीपीआरप्रमाणे महत्वाचे थांबे घेणारी धीमी बुलेट मुंबई ते नागपूर प्रवासासाठी 4 तास 15 मिनिटे घेणार आहे. तर मुंबई ते शिर्डी या अंतराला 1 तास 10 मिनिटे लागणार आहेत.

बीकेसीतून सुरुवात

मुंबई ते नागपूर बुलेट ट्रेनच्या प्रवासाकरीता प्रवाशांना सध्याच्या फर्स्ट क्लास एअर कंडीशन्ड प्रवास भाड्याच्या 1.5 पट भाडे भरावे लागणार आहे. मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गाच्याकडेने मुंबई ते नागपूर बुलेट ट्रेनचा मार्गाचा प्रस्ताव आहे. मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनचे सुरुवातीचे स्थानक असलेल्या वांद्रे – कुर्ला कॉम्प्लेक्स ( बीकेसी ) येथून या मार्गाची सुरुवात होणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना भविष्यात अवघ्या एका तासात शिर्डीला पोहचता येणार आहे. मुंबई ते अहमदाबाद 508 कि.मी. लांबीच्या बुलेट ट्रेन मार्गाच्या महाराष्ट्रातील कामाला अद्याप म्हणावा तसा वेग आलेला नाही. मात्र गुजरात येथील बुलेट ट्रेनचे काम वेगाने सुरु असून त्या भागात बुलेट ट्रेन आधी सुरु करण्याची नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडची योजना आहे.