अंबरनाथ : 4 ऑक्टोबर 2023 | पालिका अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेला चार मीटरचा रस्ताच गायब झालाय. या घटनेमुळे नागरिकही अचंबित झालेत. कुठे गेला हा रस्ता अशी विचारणा नागरिक करत आहेत. मनसेच्या कार्यकर्त्यांनी ही रस्ता चोरीची घटना उघडकीस आणली आहे. शिवाजी नगर पोलीस ठाण्याच्या आवारातील हा सार्वजनिक रस्ता चोरीला गेलाय. या घटनेवरून मनसेने अंबरनाथ नरगरपालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण केलंय. अंबरनाथ पूर्व भागातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याशेजारी असलेला सार्वजनिक रस्ता हा नऊ मीटर रुंदीचा आहे. तशी नोंद पालिकेच्या नगररचना विभागात आहे. या रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या इमारतींच्या विकासकांनीही इमारत बांधकाम परवानगी घेताना हा रस्ता नऊ मीटर रुंदीचा अस्तित्वात असल्याचे कागदोपत्री दाखवलं.
शिवाजीनगर पोलीस ठाणे, गावदेवी मैदान, यूपीएससी सेंटर अशा महत्वाच्या सार्वजनिक ठिकाणी जाण्यासाठी हा रस्ता वापरण्यात येतो. पालिकेत कागदोपत्री हा रस्ता नऊ मीटर अशी नोंद आहे. पण, प्रत्यक्षात मात्र हा रस्ता पाच मीटरच आहे. त्यामुळे उर्वरित चार मीटरचा रस्ता गेला कुठे असा प्रश्न मनसेने उपस्थित केलाय.
पालिकेचा रस्ता चोरीला गेला की काय अशी काहीशी परिस्थिती शहरातल निर्माण झाली असा आरोप मनसेने केला. तर, प्रत्यक्षात हा रस्ता अवघा चार ते पाच मीटरचा असताना पालिका प्रशासनाने या इमारतींना कोणत्या आधारे परवानगी दिली असा सवाल मनसेने उपस्थित केला आहे. नगर रचना विभागातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून हा रस्ता नऊ मीटरचा दाखविण्यात आला. त्याआधारे विकासकांनी इमारतीची परवानगी घेतली असा आरोप मनसेचे शहर सचिव गौरव राजपूत यांनी केलाय.
मनसे शहर सचिव गौरव राजपूत यांनी हा प्रकार उघडकीस आणत अंबरनाथ नरगरपालिकेच्या कारभारावरचं प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या आवारातील सार्वजनिक रस्ताच चोरीला गेला आणि यामागे अधिकारी, विकास यांचा हात आहे. यात मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाण घेवाण झाली असल्याची शक्यताही त्यांनी वर्तविली. मनसेने या रस्त्याची मोजणी केली आहे. त्यामुळे हा आरोप करत आहोत असेही त्यांनी सांगितले.