नागपूर | 12 डिसेंबर 2023 : विधान परिषद सभागृहात कॉंग्रेस आमदार भाई जगताप यांनी एका महत्वाच्या मुद्द्याकडे सभागृहाचे लक्ष वेधले. एक प्रश्न निर्माण झाला आहे. एका प्रश्नामध्ये आमची नावे चुकीने टाकली गेली आहेत. हा विषय सेन्सेटिव्ह आहे. त्यामुळे त्याची नोंद घ्यावी, अशी विनंती भाई जगताप यांनी उपसभापती नीलम गोऱ्हे यांना केली. हा तारांकित प्रश्न आहे. मराठा समाज, त्यांचे आंदोलन, त्यांना कुणबी समाजाचे प्रमाणपत्र असे काही विषय आहेत. मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे. अशावेळी आम्हाला न विचारता आमची नावे यात टाकली आहेत असा खुलासा आमदार भाई जगताप यांनी केला.
तारांकित प्रश्न होता. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीकरण न करण्याबाबत अशा पद्धतीने तो प्रश्न आहे. यात पहिले नाव अडबाले यांचे नाव आहे. त्याखाली आमची नावे आहेत. हा सेन्सेटिव्ह विषय आहे. त्याची नोंद घ्यावी असे भाई जगताप म्हणाले.
राज्यात जे वातावरण आहे अशावेळी असे प्रश्न निर्माण करणे, गैरसमज निर्माण करणे हे योग्य नाही. त्यांना ट्रोल केले जाते. तुम्हाला गावामध्ये समाजाच्या बैठकीला येता येणार नाही अशी त्यांची भूमिका आहे. राज्यात अशी परिस्थिती निर्माण झाली असताना सर्वांनी भान ठेवा. या बाजूचे, त्या बाजूचे असा हा विषय नाही. सरकार आणि विरोधी पक्ष असाही विषय नाही असे त्यांनी स्पष्ट केले.
हा समाजाचा प्रश्न आहे. ओबीसी, धनगर, आदिवादी या समाजाचेही प्रश्न आहेत. त्यामुळे आमची विनंती आहे की, आमची चुकीची नावे टाकली गेली आहेत या प्रश्नामध्ये. आम्ही आमच्या बाजूने खुलासा करतो की यात आमचा काही संबध नाही, आम्ही असा प्रश्न विचारला नाही. असे भाई जगताप म्हणाले.
आमच्याबद्दल सोशल मिडीयावर वाईट पसरवले जात आहे. हा प्रश्न चर्चेला आलेला नाही पण, त्या सूचित आमचे नाव आले आहे. आमची चुकीची नावे टाकली गेली आहेत. त्यामुळे आम्ही आमच्या बाजूने खुलासा करतो असे ते म्हणाले. यावर उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी काही प्रश्न वेगळे दिले असतील. ते एकत्र क्लब झाले असतील तर ते तपासून पाहू. काही सदस्यांचे प्रश्न असतात. एखाद्या प्रश्नाचा आशय सारखा असेल तर याची चौकशी केली जाईल. विशेष म्हणजे हे सर्व एकाच पक्षाचे सदस्य आहेत. असे का झाले? याची माहिती घेऊन चर्चा करू, असे उपसभापती यांनी स्पष्ट केले.