नाशिक : सलग तिसऱ्या दिवशी आलेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याने उत्तर महाराष्ट्रातील ( North Maharashtra ) नागरिकांची अक्षरशः दाणादाण करून टाकली आहे. शेतकरी तर अक्षरशः उद्ध्वस्त झालेला आहे. रब्बीचे पीकाचे मोठे नुकसान झाल्याने बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. अशातच याच बळीराजाच्या मुलांवरही संकट कोसळलं आहे. आधीच बिकट परिस्थिती असलेल्या शाळेत शिक्षण घेत असतांना अवकाळी पावसाचा ( Unseosonal Rain ) शाळेला मोठा फटका बसला आहे. शाळेचे पत्रे उडून गेले असून मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने शाळेची सुट्टी झालेली आळसयाने कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. मात्र, शाळेतील सर्वच वस्तु पाण्याने भिजल्याने मोठे नुकसान झाले आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरणात मोठा बदल झाला आहे. रात्रीच्या वेळी अवकाळी पाऊस आणि वादळी वारा असल्याने शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. अशातच नाशिकच्या देवळा तालुक्यातील दहिवड शाळेवर संकट कोसळले आहे.
दहिवड परिसरात मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामध्ये वादळी वारा असल्याने जिल्हा परिषदेच्या शाळेचे पत्रे उडून गेले असून शाळेतील वस्तूचे मोठे नुकसान झाले असून विद्यार्थ्यांना मोठा फटका बसणार आहे.
परीक्षा तोंडावर आलेल्या असतांना हा प्रकार घडल्याने विद्यार्थ्यांना मोठा फटका बसणार आहे. विद्यार्थ्यांना शिक्षण कुठे द्यायचे हा प्रश्न पडणार आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी जिल्हा परिषदेकडे याबाबत माहिती दिली असून तात्काळ पत्रे बसवून देण्याची मागणी केली आहे.
खरतर शाळेची सुट्टी झालेली असतांना हा प्रकार घडल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. मात्र, यानिमित्ताने शाळेचे काम कसे आहेत ? याचे वास्तव यानिमित्ताने समोर आले असून शिक्षण विभागाचे पितळ उघडं पडल्याची चर्चा सुरू झाली आहे.
दहीवड शाळेचे झालेले नुकसान पाहता आठवडाभरात शाळा सुस्थित सुरू होणार नाही. शेतकऱ्यांसमोर आधीच संकट कोसळले असतांना त्यांच्या मुलांवरही मोठं संकट कोसळले आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात बळीराजावरील संकटांची मालिका सुरूच आहे.
अवकाळी पाऊस आल्याने नाशिक जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामध्ये गहू, कांदा, द्राक्ष, डाळिंब आणि हरभरा असे विविध पिकं भुईसपाट झाले असून भरपाई देण्याची मागणी केली जात आहे. शासनाने याबाबत पंचनामा करण्याचे आदेशही दिले आहे.
आजपासून नाशिक जिल्ह्यातील शेती पिकाचे झालेले नुकसान बघून पंचनामे केले जाणार आहे. नाशिक जिल्हाधिकारी गंगाथरण डि यांनी याबाबत आदेश दिले आहे.