योगेश बोरसे, टीव्ही 9 मराठी, नाशिक : कसबा पेठच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. सुरुवातीला ही निवडणूक बिनविरोध होईल अशी स्थिती होती. मात्र, आता तशी स्थिती राहिली नाही. कॉंग्रेसने यामध्ये उमेदवार देण्याची तयारी केली आहे. कसबा पेठमध्ये सुरुवातीपासूनच भाजप विरुद्ध कॉंग्रेस अशी लढत राहिली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या वतिने कॉंग्रेसने ही जागा लढविण्याची तयारी सुरू केली आहे. अशातच शिवसेना ठाकरे गटानेही याबाबत निवडणूक लढणारच असा पवित्रा घेतला आहे. सोशल मीडियावर ठाकरे गटाकडून बॅनरबाजी केली जात आहे. त्यानुसार कसबा पेठची निवडणूक लढणारच असा मजकूर असलेले पोस्टर पुण्यात दिसू लागले आहे. तर दुसरीकडे पुणे महानगर पालिकेत ना हरकत दाखला घेण्यासाठी भाजपने आणि कॉंग्रेसने अर्ज दाखल केले आहे.
भाजपकडून माजी स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासणे, माजी सभागृह नेते धीरज घाटे यांच्यासह मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांनी ना हरकतसाठी अर्ज केला आहे. तर कॉंग्रेसकडून रवींद्र धंगेकर यांनीही ना हरकतसाठी अर्ज दाखल केला आहे.
त्यामुळे कसबा पेठची आजवर भाजप आणि कॉंग्रेसमध्ये थेट लढत झालेली असतांना आणि आताही तशी निवडणूक होणार असल्याची स्थिती असतांना ठाकरे गटाने निवडणूक लढणारच असे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे.
पुण्यात कसबा पेठ निवडणूक लढण्यासाठी शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे. त्यामध्ये ठाकरे गटाचे महानगरप्रमुख संजय मोर हे इच्छुक आहेत. पुण्यातील संपर्क प्रमुखांच्या बैठकीत हा निर्णय एकमुखाने घेण्यात आला आहे.
भाजपच्या विरोधात महाविकास आघाडीच्या कॉंग्रेस पक्षाकडून ही जागा लढवली जाईल अशी शक्यता असतांना जोरदार तयारी केली जात आहे. त्यातच आता ठाकरे गटानेही निवडणूक लढविण्यास सुरुवात केल्यानं महाविकास आघाडीत बिघाडीची शक्यता नाकारता येत नाही.