पुरातत्व खात्याच्या नाकावर टिच्चून आग्र्याच्या लाल किल्यात साजरा होणार ‘शिवजयंती’ सोहळा

| Updated on: Feb 11, 2023 | 2:39 PM

मंत्री दीपक केसरकर यांनी तातडीची बैठक घेऊन शिवजयंती सोहळ्याचे राज्य सरकार सह आयोजक होण्यास मान्यता दिली. तसे पत्र पुरातत्त्व खात्याला देण्यात आले. यामुळे आग्रा येथील लाल किल्यात शिवजयंती सोहळा साजरा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

पुरातत्व खात्याच्या नाकावर टिच्चून आग्र्याच्या लाल किल्यात साजरा होणार शिवजयंती सोहळा
छत्रपती शिवाजी महाराज
Image Credit source: प्रातिनिधिक फोटो
Follow us on

मुंबई : आग्रा येथील लाल किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्याची परवानगी पुरातत्व खात्याने नाकारली होती. मात्र, याविरोधात अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठान आणि आर. आर. पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी दिल्ली न्यायालयात धाव घेतली होती. यासंदर्भात निकाल देताना न्यायालयाने राज्य सरकार सहआयोजक असल्यास आग्रा किल्ल्यात शिवजयंती साजरी करण्याची परवानगी मिळेल असा निर्णय दिला होता. तसेच, पुरातत्व खात्याला राज्य सरकारने पत्र पाठवून आपण सहआयोजक आहोत असे कळवले. त्यानंतरही परवानगी नाकारली गेल्यास याचिकाकर्ते पुन्हा कोर्टात येऊ शकतात, असेही स्पष्ट केले होते.

उच्च न्यायालयाच्या या निर्णयाच्या अनुषंगाने अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठान आणि आर. आर. पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्यासमवेत बैठक घेऊन राज्य सरकारने शिवजयंती कार्यक्रमाचे सहआयोजक व्हावे. तसे पत्र तातडीने केंद्र सरकारला द्यावे, अशी विनंती केली होती.

हे सुद्धा वाचा

मंत्री दीपक केसरकर यांनी तातडीची बैठक घेऊन शिवजयंती सोहळ्याचे राज्य सरकार सह आयोजक होण्यास मान्यता दिली. तसे पत्र पुरातत्त्व खात्याला देण्यात आले. यामुळे आग्रा येथील लाल किल्यात शिवजयंती सोहळा साजरा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मंत्री केसरकर यांनी शिवजयंती सोहळ्यासाठी राज्य सरकारतर्फे किती निधी द्यावा लागेल अशी विचारणा केली. परंतु, शासनावर कुठलाही आर्थिक भार पडू न देता हा शिवजयंती सोहळा साजरा करण्यात येणार आहे. अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठान आणि आर. आर. पाटील फाउंडेशन या शिवजयंतीचा पूर्ण खर्च करणार आहे, अशी माहिती याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी दिली.

शिवजयंती सोहळ्यासाठी सरकारने निधी उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली याबद्दल आभार व्यक्त करताना सरकारने फक्त सह आयोजकत्व स्वीकारल्याचे पत्र पुरातत्व खात्याला द्यावे. एक शिवप्रेमी आणि शिवभक्त म्हणून आम्ही खर्च करू असे विनोद पाटील यांनी स्पष्ट केले. मंत्री दिपक केसरकर यांनी केंद्रीय पुरातत्व खात्याला राज्य सरकार सहआयोजक असल्याचे पात्र पाठविले. यामुळे शिवजयंती मोठ्या धूमधडाक्यात लाल किल्यावर साजरी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.